गट कॉंग्रेस समित्या बरखास्त

0
40

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काल अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने सर्व गट कॉंग्रेस समित्या त्यांच्या अध्यक्षांसह विसर्जित केल्या. त्याशिवाय जिल्हा कॉंग्रेस समित्याही बरखास्त केल्या आहेत. मात्र जिल्हा कॉंग्रेस समित्यांच्या अध्यक्षांना पदावरून हटवण्यात आलेले नाही.

विसर्जित करण्यात आलेल्या गट कॉंग्रेस समित्या व जिल्हा समित्या महिन्याभरात पुनर्रचित करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या सर्व समित्या लवकरच बरखास्त करण्यात येणार असल्याचे काही दिवसांपूर्वी स्थानिक नेत्यांनी म्हटले होते. प्रभारी श्री. गुंडूराव, निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांच्या गोवा दौर्‍यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, पक्षाची समन्वय समिती अजूनही अस्तित्वात असल्याचे काल ज्येष्ठ नेते रमाकांत खलप यांनी सांगितले. नव्याने समित्या ठरवताना समन्वय समितीचा सहभाग असेल असे त्यांनी स्पष्ट केेले.