राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण १.३७ टक्क्यांवर नवे केवळ ५७ रुग्ण; एकाचा बळी

0
44

>> नवे केवळ ५७ रुग्ण; एकाचा बळी

कोरोनाची दुसरी लाट आता राज्यातून हळूहळू ओसरू लागली असल्याचे स्पष्ट झाले असून, काल ४१४७ जणांचे नमुने तपासले असता, त्यापैकी अवघ्या ५७ जणांनाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. परिणामी कोरोना संसर्गाची टक्केवारी आता आणखी घसरली असून, ती १.३७ टक्के एवढी झाली आहे. तसेच काल कोविडमुळे केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोविडमुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या ३१८६ एवढी झाली आहे.

गेल्या २४ तासात कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८० एवढी असून, आता राज्यातील सक्रिय कोविड रुग्णांची संख्या ८७५ पर्यंत खाली आली आहे.

गेल्या २४ तासांत इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५ एवढी आहे, तर इस्पितळात भरती करण्यात आलेल्यांची संख्या ११ एवढी आहे. आजच्या घडीला सर्वांत जास्त रुग्ण संख्या मडगाव येथे असून, ती ७६ एवढी आहे. कांसावली येथे ५५, सांगे येथे ३३, कुठ्ठाळी येथे ३२, लोटली येथे ३३, कुडतरी येथे ३०, नावेली येथे २४, शिरोडा येथे १८, कुडचडे येथे १९ अशी सक्रिय रुग्णांची संख्या आहे.