तालिबानचा कब्जा असलेल्या अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी भारतीयांसह इतर शेकडो विदेशी नागरिक धडपडत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या ‘अफगाण स्पेशल सेल’ या विभागाला गेल्या ५ दिवसांत मदतीसाठी २ हजारांहून अधिक फोन कॉल आले आहेत. तर ६ हजारांहून अधिक वॉॅट्सऍप मेसेजेसना रिप्लाय देण्यात आला आहे. जवळपास १२०० हून अधिक मेलना उत्तर देऊन नागरिकांना मदत पोहोचवण्यात येत आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
अफगाणिस्तानातून भारतात येण्यासाठी धडपडत असलेल्या भारतीयांना आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी हा ‘अफगाण स्पेशल सेल’ स्थापन करण्यात आला आहे.
३९० भारतीयांना आणले
रविवारी तीन विमानांद्वारे ३९० नागरिकांना भारतात आणण्यात आले. यापैकी ३२९ भारतीय नागरिक आहे. तर २३ अफगाण शीख आणि हिंदू आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तिथे अडकलेल्या भारतीयांना विशेष विमानांद्वारे मायदेशात आणले जात आहे.
चेंगराचेंगरीत ७ ठार
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्याने अफगाणिस्तान सोडण्याच्या तयारीत काबूल विमानतळाच्या बाहेरील परिसरात हजारो नागरिक आहेत. विमानतळाच्या आत दाखल होण्यासाठी झालेल्या गोंधळात ७ अफगाणिस्तानच्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती ब्रिटनच्या सैन्याकडून देण्यात आली आहे.
जी-७ देशांची बैठक
अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जी ७ देशांची तातडीची बैठक बोलवली आहे. गेल्या आठवड्यात बायडेन आणि जॉन्सन यांची अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली होती. संयुक्त धोरण ठरवण्यासाठी २४ ऑगस्टला या बैठकीचे आयोजन केले आहे. जी ७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे.