पुन्हा तालिबान

0
62

अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेतल्यापासून अल्पावधीत आणि अपेक्षित कालावधीच्याही आधी तालिबानने अफगाणिस्तानातील एकेक शहर सर करीत काल राजधानी काबूलमध्ये पाऊल टाकले. सत्तांतरासाठी हिंसाचाराऐवजी वाटाघाटींचा मार्ग अवलंबून तालिबानने आपण ‘गुड तालिबान’ असल्याचा साळसूद मुखवटा जरी धारण केलेला असला, तरी आजवर अफगाणिस्तानमध्ये मृत्यूचे थैमान घालणारे कोण होते हे पाहिले तर ह्या तालिबान्यांचा खरा चेहरा लपून राहू शकत नाही.
अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीचा निर्णय घेताना तेथे जे ‘लोकनियुक्त’ सरकार सत्तारूढ केले, ते सुरवातीपासूनच भ्रष्टाचार, गटबाजी आणि बेबंदशाहीच्या मार्गाने वाटचाल करीत राहिले. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी आणि त्यांचे मुख्य कार्यकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यात तीव्र मतभेद होते. उपराष्ट्राध्यक्ष अब्दुल राशीद यांना तर लैंगिक छळाच्या आरोपावरून देश सोडावा लागला. हे लोकनियुक्त सरकार केवळ अमेरिकेच्या हातचे बाहुले असल्याची अफगाण नागरिकांची भूमिका बदलू शकली नाही. त्याचीच परिणती आज तालिबानच्या पुनरागमनात झाली आहे.
अफगाणिस्तानमध्ये भारतासह अनेक देशांनी आपला पैसा ओतून त्याची नवी उभारणी करण्यासाठी सर्व पाठबळ पुरवले होते, तरी प्रत्यक्षात तेथील सरकारने आपली पाळेमुळे घट्ट रोवणे गरजेचे होते, जे घडू शकले नाही, त्यामुळे नाटो आणि अमेरिकेच्या सैनिकांचे पाय माघारी वळू लागताच तालिबान्यांनी डोके वर काढले आणि बघता बघता आपले हात पाय पसरायला सुरूवात केली. कतारच्या पुढाकाराने ज्या काही शांततेच्या वाटाघाटी चालल्या होत्या, त्याची फलनिष्पत्ती काय झाली हे आज जगाला दिसतेच आहे.
तालिबानने आज जरी आपण पूर्वीच्या तालिबानी राजवटीपेक्षा वेगळे असल्याचा आव आणला असला, तरी शहरामागून शहरे ताब्यात घेत असताना ती शस्त्रांच्या बळावरच घेतली गेली आहेत. गोळ्याच चालवल्या गेल्या आहेत. काबुलमध्ये आल्यानंतर एकाएकी शांतिदूत बनलेल्या तालिबान्यांच्या अमलाखाली जेव्हा अफगाणिस्तानसारखा विशाल देश जाईल, तेव्हा जगासाठी तो केवढा मोठा धोका असेल हे वेगळे सांगण्याचीही गरज नसावी. तालिबानने जलालाबाद, मजार ए शरीफ, हेरात, कंदाहार अशी एकामागून एक शहरे ताब्यात घेतली त्यानंतर तेथील महिला आज रोजच्याप्रमाणे बुरखा घालून कामावर आहेत, सारे काही आलबेल आहे, लोकांनी तालिबानला स्वीकारले आहे, असे गोंडस चित्र जरी उभे केले जात असले तरी तालिबानचा हा गोड चेहरा किती दिवस गोड राहील? बामियॉंच्या प्राचीन बुद्धमूर्ती उद्ध्वस्त करणार्‍या राक्षसांचाच वारसा मिरवणार्‍यांपासून तशी अपेक्षा करणेच भोळेपणाचे ठरेल. सांडपाण्याच्या टँकरमध्ये दीड हजार किलो स्फोटके घालून स्फोट घडवणारे, सैन्य ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली मिनीबस धडकवणारे, डॉक्टरच्या वेशात इस्पितळात दहशतवादी पाठवणारे कोण होते? अफगाणिस्तान तालिबानकडे गेल्याने भारताने केलेली अब्जावधींची गुंंतवणूक तर पाण्यात गेली आहेच, परंतु उद्या भारतविरोधी शक्तींना तेथे हक्काची आश्रयस्थाने निर्माण झाली तर त्याचे चटके देशाला – विशेषतः काश्मीरला बसल्याखेरीज राहणार नाहीत. भारत – पाकिस्तान वादात आम्ही पडणार नाही असे भले तालिबान आज सांगत असली तरी उद्या काय घडेल हे सर्वज्ञात आहे.
अफगाणिस्तानचा ताबा अमेरिकेने लोकनियुक्त सरकारकडे दिला तेव्हा देखील जवळजवळ चाळीस टक्के भूभागावर एक तर तालिबान नाही तर आयसिसचा ताबा होता. आयसिसने पूर्व अफगाणिस्तानात ‘विलायत खोरासान’ स्थापन केली होती. अमेरिकेला आपण बनवलेला सर्वांत मोठा शक्तिशाली बॉम्ब अफगाणिस्तानातच टाकण्याची गरज निर्माण झाली होती. हा सगळा गतइतिहास आज विसरता येत नाही. तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान जात असताना ह्या सगळ्या गतइतिहासाकडे कानाडोळा करणे उद्या अमेरिकेसह संपूर्ण जगासाठी धोक्याचे ठरेल.
अफगाणिस्तानचा ताबा तालिबानकडे चालला आहे हे दिसताच तेथील नागरिक कसे भयभीत झाले आहेत, देशाबाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद झाल्याने कसे कोंडीत सापडले आहेत त्याची दृश्ये विदारक आहेत. काही सुदैवी सैनिक उझबेकिस्तानात पळाले. इतरांना मृत्युदंड अटळ आहे. ही तथाकथित ‘गुड तालिबान’ देशात उद्या ‘शरीयत’ लागू केल्याशिवाय राहील? एकेकाळी रशियाविरुद्ध लढणार्‍या तालिबान्यांवर वरदहस्त ठेवणार्‍या अमेरिकेनेच अफगाणिस्तानसारख्या प्राचीन देशाला पुन्हा एकदा अनिश्‍चिततेच्या खाईत लोटून दिले गेले आहे.