पी. चिदंबरम ठरवणार कॉंग्रेसची रणनीती

0
46

>> गोवा वरिष्ठ निवडणूक निरीक्षक व रणनीतीकारपदी पक्षाकडून नियुक्ती

चार वेळा देशाचे अर्थमंत्रीपद भूषविलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची पक्षाने गोव्याचे वरिष्ठ निवडणूक निरीक्षक व आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठीचे रणनीतीकार म्हणून नियुक्ती केली आहे.

पी. चिदंबरम यांच्या नियुक्तीचे राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी स्वागत केले असून, त्यांच्या नियुक्तीचा गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाला चांगला फायदा होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍड्. रमाकांत खलप यांनी या नियुक्तीचे स्वागत करताना ही अत्यंत आनंदाची वार्ता असल्याचे सांगितले. भारताचे माजी अर्थमंत्री या नात्याने देशाच्या अर्थकारणाला चांगले योगदान दिलेले पी. चिदंबरम हे एक अत्यंत बुद्धिमान नेते असून, त्यांच्या नियुक्तीचा कॉंग्रेसला गोव्यात चांगला फायदा होणार असल्याचे खलप यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले.
नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो आणि पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.