>> राज्य सरकारचा निर्णय
>> जिमखाना व सांस्कृतिक शुल्काचाही समावेश
उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत येणार्या सर्व महाविद्यालयांचे ५० टक्के शैक्षणिक शुल्क (ट्यूशन फी) चालू वर्षाच्या सर्व महाविद्यालयीन प्रवेशासाठी माफ करण्याचा निर्णय गोवा राज्य सरकारने घेतला आहे. शैक्षणिक शुल्काबरोबरच जिमखाना शुल्क व सांस्कृतिक शुल्कही ५० टक्के माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
राज्यातील कोविड महामारी आणि त्यामुळे निर्माण झालेली कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने शिकवणी शुल्क आणि त्याचसोबत जिमखाना व सांस्कृतिक शुल्कही माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
कोविड महामारीमुळे राज्यातील उद्योगधंद्यांवर कधी नव्हे एवढा परिणाम झाला आहे. तसेच काही उद्योगधंदे बंदही पडलेले आहेत. त्याचबरोबर काही नोकरदारांना त्यांची नोकरीही गमावून बसवण्याची वेळ आलेली आहे. काही नोकरदारांच्या पगारात काही खासगी कंपन्यांद्वारे कपात करण्यात आल्यामुळे त्याचाही परिणाम झालेला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर विद्यालयांनी आपल्या शैक्षणिक शुल्क व अन्य शुल्कात कपात करावी अशी मागणी गेल्या वर्षापासून राज्यात पालकांद्वारे करण्यात येत होती.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन स्तरावरीलही वर्ग ऑनलाइन पद्धतीने चालवण्यात येत असतानाही विद्यालये तसेच महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून सर्व प्रकारचे शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर सरकारने शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
विद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही
सरकारने राज्यातील विद्यालये खुली करण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कोविडसाठीच्या दोन डोसमध्ये जास्त अंतर न ठेवता नागरिकांना लस देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. विद्यालये सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना कोरोनाप्रतिबंधक दोन्ही डोस देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढलेल्या केरळ राज्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, आम्ही विद्यालये खुली करण्याची घाई करणार नसून अजून काही दिवस थांबून परिस्थितीत आणखी सुधारणा होण्याची वाट पाहणार असल्याचे स्पष्ट केले.