‘कोविशिल्ड’ लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करणार

0
63

>> केंद्र सरकार घेणार लवकरच निर्णय

देशात कोरोना लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्न सुरू असताना लसीकरणात मोठा बदल होणार आहे. कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने आणखी एक निर्णय घेताना कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यात येणार आहे.

सध्या देशात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची कोविशिल्ड, हैदराबादच्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक या तिन्ही लशींचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. यातील कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सध्या १२ ते १८ आठवडे आहे. पण ते आता पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आता कोविशिल्ड कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या तयारीत आहे. पण हे अंतर फक्त ४५ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी असेल.

याबाबत दोन ते चार आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे कोव्हिड-१९ वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले.

कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंंतर ४ ते ६ आठवडे होते. त्यानंतर ते ४ ते ८ आठवडे आणि पुन्हा १२ ते १६ आठवडे करण्यात आले.