>> वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांचा इशारा
राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत डिजिटल मीटर न बसविणार्या २,९३४ टॅक्सींचे परवाने रद्द करण्याचा इशारा वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी काल दिला.
राज्यात उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. १३७ टॅक्सी चालकांनी डिजिटल मीटर बसविले आहेत. तर, ५१३ जणांनी डिजिटल मीटरसाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती मंत्री गुदिन्हो यांनी यावेळी दिली.
दुसर्या टप्प्यातील डिजिटल मीटर नोंदणीसाठी सुरुवात झाली असून येत्या ही नोंदणी १८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. टॅक्सी मालकांना दोन हप्त्यांत आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले. राज्य सरकारने डिजिटल मीटरप्रश्नी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
काळ्या पिवळ्या टॅक्सींना दरवाढ
दरम्यान, राज्य सरकारने काळ्या आणि पिवळ्या टॅक्सींसाठी नवीन दर जाहीर केला आहे. या दरात किलोमीटरमागे ३ रुपयांची वाढ केली आहे. राज्यातील टॅक्सी चालकांची कित्येक वर्षांपासून ही दरवाढीची मागणी होती. आता ही सरासरी तीन रुपये दरवाढ जाहीर केली असून या संदर्भात अधिसूचना वाहतूक खात्याने काल काढली.
ही दरवाढ विविध टॅक्सींच्या वाहन प्रकारावरून करण्यात आल्याची माहिती मंत्री गुदिन्हो यांनी दिली.