साखळी नगरपालिकेत पुन्हा एकदा सत्तानाट्यास सुरूवात

0
102

>> नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्याविरोधात अविश्‍वास

साखळी नगरपालिकेत पुन्हा एकदा सत्तानाट्य रंगले असून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांवर अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला आहे. नगराध्यक्ष राया पार्सेकर तसेच उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांच्या विरोधात सहा नगसरसेवकांनी काल अविश्वास ठरावाची नोटीस बजावली. आता या ठरावावर उद्या शुक्रवार दि. ६ व शनिवार दि. ७ ऑगस्ट रोजी साखळी पालिका कार्यालयात चर्चा होणार आहे.

भाजप नगरसेवक आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर, शुभदा सावईकर, रश्मी देसाई, ब्रह्मा देसाई, यशवंत माडकर यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल केला आहे. नगराध्यक्ष राया पार्सेकर यांच्यावरील ठरावावर दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता तर उपनगराध्यक्ष सावळ यांच्यावरील ठरावावर दि. ६ रोजी दुपारी ३ वाजता चर्चा होणार आहे. माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्या टूगेदर फॉर साखळी गटात राया पार्सेकर, ज्योती ब्लेगन, कुंदा माडकर, असिरा खान, राजेंद्र आमेशकर, राजेश सावळ हे नगरसेवक आहेत. भाजपकडे सहा नगरसेवकांचे पाठबळ असूनही भाजपने नगराध्यक्षांवर पुन्हा अविश्वास ठराव दाखल केलेला आहे. सध्या सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली असून त्यावरील सुनावणी सुरू आहे. भाजपला पालिकेवर पुन्हा आपली सत्ता स्थापन करायची आहे. त्यासाठी भाजपचे प्रयत्न चालू आहेत.