महाराष्ट्रात दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये तसेच पुरामुळे आतापर्यंत १३७ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच महाराष्ट्रात पाऊस आणि पूरस्थितीत मदत व बचावकार्य सुरू असून मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. राज्यात आतापर्यंत ढिगार्याखालून ७३ मृतदेह काढण्यात आले असून ४७ जण अजूनही बेपत्ता आहेत. रायगड जिल्ह्यातील तळीये गावातून सर्वाधिक ४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सातार्यात अजूनही बचावकार्य सुरू आहे.
महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने भीषण स्थिती निर्माण झाली आहे. एकट्या महाराष्ट्रात एनडीआरएफच्या तब्बल ३४ टीम्स मदत आणि बचावकार्य काम करत आहेत. तर कर्नाटकमध्ये ७ आणि तेलंगणमध्ये ८ टीम मदत आणि बचावकार्य करत आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार पावसामुळे पुणे, कोकण आणिइतर विभागात दरड कोसळून १३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात रायगड जिल्ह्यातील ५२ जणांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीला तर कोल्हापुरात पंचगंगेला पूर आला आहे.
बिहार, उत्तर प्रदेशातही पूर
दरम्यान, मुसळधार पावसामुळे बिहारमध्येही अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. या जिल्ह्यांमध्ये आणखी दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशार दिला आहे. तर उत्तर प्रदेशच्या हवामान विभागाने राज्यात अलर्ट जारी केला आहे. राज्यातील १०० हून अधिक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तर उत्तराखंडमध्ये रविवार ते बुधवार दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, हरणाया आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजस्थानमध्येही हवामान खात्याने पुढील तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाचा व रेड अलर्टचा इशारा दिला आहे.