जम्मूत द्रोन हल्ला

0
184

भारतीय हवाई दलाच्या जम्मूतील तळावर काल रात्री झालेला दुहेरी द्रोन हल्ला आणि नंतर सापडलेली स्फोटके जम्मू – काश्मीर पुन्हा पेटवण्याच्या पाकिस्तानी कटकारस्थानाकडेच लक्ष वेधत आहेत. ह्या हल्ल्यामागचे कारण तर स्पष्टच आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काश्मीर खोर्‍यातील चौदा राजकीय पक्षांच्या नेत्यांची झालेली बैठक जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा लोकशाही राजकीय प्रक्रिया सुरू होण्याची आशा पल्लवीत करून गेली असल्यामुळेच भारतविरोधी शक्तींचे धाबे दणाणले आहेत. त्यातूनच सध्या काश्मीर खोर्‍यामध्ये दहशतवादी कारवायांना गती मिळाल्याचे दिसते आहे. खरे पाहता भारत – पाकिस्तान सीमा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा सध्या शांत आहे. गेले जवळजवळ तीन महिने भारत – पाक दरम्यान तेथे थेट संघर्ष झडलेला नाही, परंतु पाकिस्तानी प्रॉक्सी युद्ध काही बंद झालेले नाही. स्वतः नामानिराळे राहून आपल्या हस्तकांमार्फत भारताची कुरापत काढत राहण्याची आयएसआयची नीती काही सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटनंतरही थांबलेली नव्हती, परंतु फक्त त्यातील पाकिस्तानचा प्रत्यक्ष सहभाग कुठेच दिसू नये ह्याची काटेकोर काळजी घेत त्या तुरळक कारवाया सुरू होत्या. मात्र ह्या पार्श्वभूमीवर जम्मू हवाई दल तळावरील हल्ला हा त्यामागे असलेले लक्ष्य आणि त्याचे एकंदर स्वरूप ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करता अतिशय गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे.
भारतीय हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला ही काही साधीसुधी बाब नव्हे. शिवाय त्यामध्ये झालेला द्रोनचा वापर हा भारतातील संरक्षणस्थळांवर झालेला अशा प्रकारचा पहिलाच हल्ला आहे. पाकिस्तानकडून द्रोनचा वापर ह्यापूर्वीही आपल्याकडे अनेकदा झाला होता, परंतु तो केवळ सीमेपलीकडून भारतीय सीमेत टेहळणीसाठी किंवा शस्त्रास्त्रे टाकण्यासाठी होत आला होता. मात्र ह्या हल्ल्यात थेट द्रोनद्वारे आयईडी स्फोटके जम्मूच्या हवाई दलाच्या तळावर टाकून स्फोट घडवण्यात आले. पहिल्या स्फोटात तळावरील तांत्रिक विभागाची इमारत लक्ष्य करण्यात आली, तर त्यानंतरच्या पाच मिनिटांनी झालेल्या दुसर्‍या स्फोटाचे लक्ष्य तेथील मैदान होते. म्हणजेच पहिल्या स्फोटानंतर इमारतीतून हवाई दलाचे कर्मचारी बाहेरच्या मैदानात आले की पुन्हा ते लक्ष्य ठरावेत असे हल्ल्यामागील नियोजन असावे. स्फोटांसाठी वापरण्यात आलेली दोन्ही द्रोन ही दूरनियंत्रित होती. म्हणजेच हा नियोजनबद्ध हल्ला होता. जीपीएसद्वारे हल्ल्याची नेमकी ठिकाणे निश्‍चित करण्यात आलेली होती असा त्याचा अर्थ होतो आणि हे अधिक गंभीर आहे.
सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे दोन्ही द्रोन आले कुठून? जम्मू हवाई तळापासून पाकिस्तानी सीमा तशी जवळ नाही. ते अंतर चौदा कि. मी. आहे. त्यामुळे पाकिस्तानी हद्दीतूनच ही द्रोन पाठवली गेली होती आणि तरीही ती आपल्या सीमा सुरक्षा दलांच्या नजरेस आली नाहीत का? की जम्मूमधूनच दहशतवाद्यांनी ती संचलित केली हे तपासातच स्पष्ट होईल. सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे घेऊन द्रोन तब्बल बारा कि. मी. आत आल्याची घटना यापूर्वी घडलेली आहे. त्यामुळे ही द्रोनही सीमेपलीकडून आली असतील तर ती संरक्षणदृष्ट्या फार मोठी त्रुटी ठरते. कोणतेही विनापरवाना द्रोन दिसले तर ते मागचापुढचा विचार न करता पाडायचे हा नियम आहे. रडारवर हे कमी उंचीवर उडणारे छोटे द्रोन दिसू शकत नसल्याने ऑप्टिकल सेन्सर्स किंवा आरएफ सेन्सर्सद्वारे त्यांचा वेध घेतला जात असतो. प्रस्तुत घटनेत हवाई दलाच्या गस्तीपथकानेच रात्रीच्या अंधारात आकाशात ते चकाकताना पाहिले, परंतु रात्रीच्या वेळी हा हल्ला झाल्याने त्याला वेळीच पाडणे त्यांना शक्य झाले नाही. तशी द्रोनविरोधी यंत्रणा ह्या तळावर असण्याची शक्यताही कमी आहे, परंतु यापुढे सर्व सुरक्षा तळांवर तशी यंत्रणा उभारावीच लागेल, कारण बदलत्या काळानिशी दहशतवादही स्वरूप बदलत चालला आहे. अमेरिकेच्या जागतिक व्यापार केंद्रावरचे विमान हल्ले असोत, मुंबईत सागरी मार्गाने झालेला हल्ला असो किंवा प्रस्तुत द्रोन हल्ला असो, हल्ल्यामध्ये ‘नावीन्य’ आणून सुरक्षा यंत्रणांना चकित करण्याचे दहशतवाद्यांचे तंत्र असते. त्यामुळे द्रोनच नव्हे, तर यापुढे जैविक, रासायनिक, विषारी वायूहल्ल्यांना सामोरे जाण्याची तयारी देखील आपल्या सुरक्षा यंत्रणांनी ठेवणे आवश्यक आहे. जम्मू हवाई तळावरील ह्या दहशतवादी हल्ल्याने सहा वर्षांपूर्वीच्या पठाणकोट हल्ल्याच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. तो हल्ला जैश ए महंमदने केला होता. जम्मूतील हल्ल्यामागे लष्कर ए तय्यबा असल्याचा संशय आहे. नावे वेगळी असतील, परंतु म्होरक्या पाकिस्तान आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटनेही त्याची नांगी ठेचली गेलेली नाही असाच ह्या घटनेचा खरा अर्थ!