पोलिसांकडून २०२१ मध्ये आतापर्यंत १.१६ कोटींचे अमली पदार्थ जप्त

0
124

>> ७ विदेशींसह ४८ भारतीयांना अटक

गोवा पोलिसांनी वर्ष २०२१ मधील आतापर्यंतच्या १७२ दिवसांत १ कोटी १६ लाख ३२ हजार १०० रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले असून या प्रकरणी ५५ जणांना अटक केली आहे. त्यात ४८ भारतीय आणि ७ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

उत्तर आणि दक्षिण गोव्यातील पोलीस, अमलीपदार्थ विरोधी विभाग आणि गुन्हा अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. उत्तर गोव्यात अमलीपदार्थाच्या ३० प्रकरणांची नोंद झाली आहे. सुमारे ३१ लाख ७४ हजार रुपयांचे अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.

गोवा पोलिसांनी मागील दोन वर्षांपासून अमलीपदार्थांच्या विरोधात कडक मोहीम हाती घेतली आहे. वर्ष २०२० मध्ये १४८ प्रकरणांची नोंद करून सर्वाधिक ७ कोटी ८ लाख ५२ हजार रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले होते. या प्रकरणी १७२ जणांना अटक करण्यात आली. त्यात ३६ विदेशी आणि १३६ देशी नागरिकांचा समावेश आहे.

गोवा पोलिसांनी वर्ष २०१९ मध्ये २१९ अमली पदार्थाच्या प्रकरणांची नोंद करून ६ कोटी ४० लाख २७ हजार रुपयांचे अमलीपदार्थ हस्तगत केले होते. या प्रकरणी एकूण २४४ जणांना अटक केली. त्यात देशी १८४ आणि ६० विदेशी नागरिकांचा समावेश होता.