एकाच दिवसात १८,६६२ जणांना लस

0
66

>> डॉ. राजेंद्र बोरकर यांची माहिती, राज्यात तिसरा टिका महोत्सव सुरू

राज्यात कालपासून सुरू झालेल्या तिसर्‍या टिका महोत्सवात राज्यभरात काल रविवारी १८,६६२ जणांना कोविड प्रतिबंधक लशीचा डोस देण्यात आल्याची माहिती राज्यातील लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली. १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना हे डोस देण्यात येत असल्याचे डॉ. बोरकर म्हणाले.

राज्यभरात सुरू करण्यात आलेल्या २०४ लसीकरण केंद्रांवरून हे डोस देण्यात आल्याचे डॉ. बोरकर म्हणाले. १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना हे डोस देण्यात येणार असून त्यासाठी येत्या ३० जुलैपर्यंत हा टिका उत्सव चालू ठेवण्यात येणार असल्याचे डॉ. बोरकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले.

काहीजण लशींविषयी असलेल्या गैरसमजुतीमुळे लस टोचून घेण्यासाठी येत नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य खात्याने हे लसीकरण आता पंचायत स्तरावर सुरू केलेले आहे. नागरिकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी आमदार, सरपंच, पंच, नगरसेवक आदींची मदत घेतली जात असल्याचे डॉ. बोरकर म्हणाले.

यापूर्वी झालेल्या टिका महोत्सवात काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला होता असेही यावेळी डॉ. बोरकर यांनी स्पष्ट केले.

संचारबंदीत २१ जूनपर्यंत वाढ
करण्याचे आदेश जारी

राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या मुदतीत सोमवार दि. २१ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्यातील संचारबंदीमध्ये वाढ केली जाते की संचारबंदी मागे घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज्यात ९ मे २०२१ पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून संचारबंदीमध्ये वेळोवेळी वाढ करण्यात आली. मागील ७ जूनला संचारबंदीमध्ये १४ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यावेळी राज्य सरकारने संचारबंदीच्या मुदतीमध्ये वाढ करताना दुकाने खुली ठेवण्याच्या वेळेत आणखी दोन तासांनी वाढ केली होती. त्यामुळे सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने खुली असून हॉटेल, रेस्टॉरंटमधील पार्सल सेवा सुरू आहे. शालेय वस्तू, पावसाळी वस्तू, बांधकाम साहित्य आदींची दुकाने खुली ठेवण्यात मान्यता दिली आहे.

नव्या आदेशानुसार नगरपालिका व पंचायत क्षेत्रातील बाजार खुले राहतील. ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा परवानगी घेऊनच आयोजित करता येईल. नगरपालिका व पंचायत क्षेत्रातील बाजारपेठा सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत खुल्या ठेवता येतील.

राज्यातील कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी झाली आहे. तसेच, कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. पणजी महानगरपालिकेचे मासळी मार्केट आज सोमवार १४ जूनपासून खुले करण्यात येणार आहे. महानगरपालिके़तर्फे नोंदणी असणार्‍या मासळी व्यावसायिकांना मासळीची विक्री करण्यास मान्यता दिली जाणार आहे. तर मुख्य मार्केट ७ जूनपासून सुरू केले आहे.