कोरोनाचे थैमान; ३१ मृत्यूंसह २११० बाधित

0
76

राज्यात कोरोना विषाणूचे थैमान सुरूच असून काल मंगळवारी कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला असून २११० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे सध्याची कोरोनाची रुग्णसंख्या १६५९१ एवढी झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १०८६ एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ८१,९०८ एवढी झाली आहे.

काल राज्यात ७४८ जण कोरोनामुक्त झाल्याने बर्‍या झालेल्यांची एकूण संख्या ६४२३१ एवढी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.४२ टक्के झाले असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १४१४ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर २१० नवे रुग्ण इस्पितळात विलगीकरणात राहिले आहेत.

३१ जणांचा मृत्यू
काल राज्यात कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला. त्यात पर्वरी येथील ६९ वर्षीय महिला, करंजाळे येथील ६० वर्षीय महिला, आके येथील ८८ वर्षीय पुरुष, काणकोणातील ९१वर्षीय पुरुष, बायणातील ७१ वर्षीय महिला, बेती येथील ४७ वर्षीय पुरुष, वास्कोतील ४७ वर्षीय पुरुष, पर्वरीतील ७१ वर्षीय महिला, डिचोलीतील ४६ वर्षीय महिला, म्हापशातील ३८ वर्षीय युवक, वास्कोतील ५८ वर्षीय पुरुष, मुरगाव येथील ५९ वर्षीय पुरुष, पणजी येथील ७१ वर्षीय पुरुष, कोलवाळ येथील ५० वर्षीयपुरुष, ताळगावातील ७४ वर्षीय पुरुष, म्हापशातील ४८ वर्षीय महिला, जुवारीनगर येथील ६५ वर्षीय महिला, कांदोळीतील ६६ वर्षीय पुरुष, केपेतील ४० वर्षीय महिला, वाळपईतील ४२ वर्षी युवक, कुळेतील ६० वर्षीय महिला, तसेच बार्देश तालुक्यातील एक ८५ वर्षीय वृद्ध महिला व तिसवाडी तालुक्यातील ५६ वर्षीय महिला यांचा मृत्यू झाला.

मडगावात १७६४ रुग्ण
राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या मडगावात असून ती १७६४ एवढी झाली आहे. कांदोळीत त्या खालोखाल म्हणजे १३९२ असून पर्वरीत ११८२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. पणजी व फोंड्यात रुग्णसंख्या हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली असून पणजीत ९५६ तर फोंड्यात ९५८ रुग्ण आहेत.
काल खात्यातर्फे ५५४८ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली.

कोरोना संसर्ग झालेल्या १९,०५८ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर ४१,९६२ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. परराज्यातून आलेल्या ३० प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

उत्तर गोव्यातील कोविड सेंटरमध्ये एकूण खाटांची संख्या २७५ असून १६५ खाटा रिक्त आहेत. तर दक्षिण गोव्यातील खाटांची संख्या १८० असून तिथे ७४ खाटा रिक्त असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.