>> ४७ वर्षांत केले होते २३१ चित्रपटांचे संकलन
हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे गोमंतकीय चित्रपट संकलक वामन भोसले (८९) यांचे सोमवारी पहाटे दीर्घकालीन आजारानंतर वृद्धापकाळाने गोरेगाव, मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र व तीन कन्या असा परिवार आहे. गेल्या वर्षी कोविडमुळे झालेल्या टाळेबंदीच्या काळापासून ते आजारी होते, असे चित्रपट दिग्दर्शक असलेले त्यांचे पुतणे दिनेश भोसले यांनी सांगितले.
आपल्या प्रदीर्घ अशा ४७ वर्षीय कारकिर्दीत वामन भोसले यांनी तब्बल २३१ चित्रपटांचे संकलन केले. १९५२ साली डी. एन. पै यांच्याकडे त्यांनी चित्रपट संकलनाचे धडे घेतले. १९६७ साली त्यांनी सर्वप्रथम राज खोसला यांच्या ‘दो रास्ते’ या चित्रपटाचे संकलन केले. १९७८ साली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटांच्या तांत्रिक विभागासाठीही पुरस्कार देण्यास सुरवात केली, तेव्हा चित्रपट संकलनासाठीचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. राज खोसला यांच्या ‘इन्कार’ या चित्रपटाच्या संकलनासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांनी सर्वात शेवटी १९९९ साली संकलन केलेला चित्रपट म्हणजे अमोल पालेकर यांचा ‘कैरी’ हा मराठी चित्रपट होय. हिंदी बरोबरच मराठी, बंगाली व हरयाणवी या भाषांतील चित्रपटांचेही त्यांनी संकलन केले. त्याशिवाय काही दाक्षिणात्य चित्रपटांचेही संकलन भोसले यांनी केले आहे. प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचे ते आवडते संकलक होते व त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे संकलन भोसले यांनी केले. १९६७ साली आपली चित्रपट संकलकाची कारकीर्द सुरू केलेल्या वामन भोसले यांनी आपल्या वयाच्या ६७ व्या वर्षी चित्रपटसंन्यास घेतला होता, हाही एक योगायोगच म्हणावा लागेल. मूळच्या बार्देश तालुक्यातील पोंबुर्पा गावच्या वामन भोसले यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९३२ रोजी झाला. ‘अनारकली’, ‘नागीन’, ‘एक मुसाफीर एक हसीना’, ‘वो कौन थी’, ‘ये रास्ते है प्यार के’ सारख्या गाजलेल्या शेकडो चित्रपटांचे त्यांनी संकलन केले. राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, झी सिने पुरस्कार, मुंबई अकादमी पुरस्कार असे कित्येक पुरस्कार त्यांना लाभले. २००८ साली ‘इफ्फी’ मध्ये जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.