कोरोनाप्रश्‍नी सरकार विरोधकांना विश्‍वासात घेत नाही ः कामत

0
159

>> फेसबूकवरील भाषणात सरकारवर टीका

राज्यातील भाजपचे सरकार कोरोना प्रश्‍नी विरोधकांना विश्‍वासात घेत नाही. सत्ताधार्‍याकडून कोरोना प्रश्‍नी राजकारण केले जात आहे. विरोधकांनी कोरोनाप्रश्‍नी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची तयारी दर्शविली असली तरी, सत्ताधार्‍याकडून विरोधकांना विश्‍वासात घेतले जात नाही. विरोधकांच्या सूचना विचारात घेतल्या जात नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी फेसबुक या समाजमाध्यमावरून थेट केलेल्या भाषणात काल केला.

राज्यातील एका ज्येष्ठ मंत्र्याकडून लग्न समारंभात कोविड एसओपीचे उल्लंघन केले जात आहे. सरकारी यंत्रणा कोरोना वाढता फैलाव रोखण्यात अपयशी ठरली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये राजकारण केले जात आहे. नागरिकांनी स्वतःच्या जिवाची काळजी घेण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी मार्केट व इतर ठिकाणी गर्दी करू नये. कोविड नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते कामत यांनी केले.

परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात
राज्यातील कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात. सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये. परराज्यातून गोव्यात प्रवेश करणार्‍यांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते कामत यांनी केली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून केवळ घोषणाबाजी केली जात आहे. प्रत्यक्ष कृती केली जात नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकारी नोकरभरतीसाठी ३ हजार नोकर्‍यांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. नोकरभरतीसाठी प्रत्यक्ष कृती अजून सुरू केलेली नाही. भाजप सरकारने यापूर्वी अनेक पदासाठी नोकरभरतीची घोषणा करून नोकरभरती प्रलंबित ठेवली, अशी टिका विरोधी पक्षनेते कामत यांनी केली.