>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही
>> आयआरबी गाळे प्रकल्पास आमदारांचा विरोध
माकाजन या गावी जेथे कुष्ठरोग्यांसाठीचे इस्पितळ होते तेथे इंडियन रिझर्व्ह बटालियनच्या पोलिसांसाठी क्वार्टर्स उभारण्यास स्थानिकांकडून होऊ लागलेला विरोध लक्षात घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्या जागेची पाहणी करण्याचे आश्वासन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. या प्रश्नी कुडतरी मतदारसंघाचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सावंत यांनी वरील आश्वासन दिले.
आपल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना रेजिनाल्ड यांनी सदर ठिकाणी आयआरबीसाठी गाळे उभारण्यास स्थानिक लोकांचा तीव्र विरोध आहे. त्यांचा प्रतिनिधी या नात्याने आपण त्यांच्याबरोबर असल्याचे रेजिनाल्ड यांनी यावेळी स्पष्ट केले. सरकारने हवे तर त्या निसर्गरम्य अशा जागेवर एक छोटेसे इस्पितळ उभारावे, अशी सूचना यावेळी रेजिनाल्ड यांनी केली.
माकाजन येथे आयआरबीसाठी गाळे बांधण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने स्थानिक आमदार म्हणून आपणाला तसेच स्थानिक पंचायतीला व लोकांना विश्वासात घ्यायला हवे होते, असे यावेळी रेजिनाल्ड म्हणाले. लोकांना हा प्रकल्प तेथे नको असल्याने सरकारने तो तेथे उभारू नये, अशी सूचनाही रेजिनाल्ड यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की सदर जमीन ही सरकारची आहे. दक्षिण गोव्यात आयआरबीसाठी गाळे नसल्याने ते तेथे उभारण्यासाठी सरकारला ती जागा योग्य असल्याचे दिसून आले. ती जमीन सरकारी असून खासगी जमीन संपादित न करता सरकारला तेथे गाळे उभारणे शक्य आहे. या सरकारी जमिनीत आता काही लोकांनी अतिक्रमणही केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी बोलताना चर्चिल आलेमाव यांनीही सरकारने हवे तर तेथे इस्पितळ उभारावे. मात्र, आयआरबीसाठी गाळे उभारू नयेत अशी सूचना केली. आमदार क्लाफासियो डायस यांनीही आयआरबीसाठी गाळे उभारण्यास विरोध केला.
आमदार रवी नाईक यांनी तळावली येथे जागा असून तेथे हे गाळे उभारावे अशी सूचना केली. मात्र, ती जागा खासगी मालकीची असल्याचे सांगून सरकारी जागा असताना सरकारला अशा खासगी जमिनी संपादित करून प्रकल्प उभारण्यास रस नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यापुढे आपला भर हा जास्तीत जास्त सरकारी प्रकल्प हे सरकारी जमिनीतच उभारण्यावर असेल, असे सावंत यांनी नमूद केले. मात्र, रेजिनाल्ड यांनी धरलेला हट्ट लक्षात घेऊन आपण माकाजन येथील सदर जमिनीची पाहणी केल्यानंतर त्या संदर्भात योग्य काय तो निर्णय घेणार असल्याचे सावंत यांनी सभागृहात स्पष्ट केले.