>> मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयास मान्यता
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जीर्ण झालेल्या कला अकादमीच्या इमारतीचे ५० कोटी रु. खर्चून नुतनीकरण करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. वास्तुशिल्प शास्त्राच्या एक सुंदर व विलक्षण असा नमुना असलेल्या कला अकादमीच्या इमारतीवर हातोडा हाणण्यात येणार नसून ही इमारत पाडली जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमालाही मंजुरी देण्यात आली. या कार्यक्रमाखाली २० पदव्युत्तर एमबीए विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येईल. त्यांना महिन्याला ३० हजार रु. मानधन देण्यात येईल. त्यांना वेगवेगळ्या मंत्र्यांच्या कार्यालयात एका वर्षासाठी काम करावे लागेल. अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
माध्यान्ह आहार
कोविड काळात विद्यार्थ्यांना १६५ दिवसांचा माध्यान्ह आहार देता आला नव्हता. शाळा बंद असल्याने त्यांना माध्यान्ह आहार देणे शक्य झाले नव्हते. या १६५ दिवसांच्या माध्यान्ह आहारासाठी धान्य देण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. कोविडसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी काल मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी मान्यता दिल्याचे सावंत यांनी सांगितले. सुमारे ९६ लाख रु. चे कोविडसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी मान्यता दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.