देशातीलच नव्हे तर जगातील एक सुंदर शहर अशी ज्याची ओळख आहे ते पणजी शहर राजधानी झाले त्या घटनेला आज २२ मार्च रोजी १७८ वर्षे पूर्ण होत आहेत. पणजी शहराला २२ मार्च १८४३ रोजी पोर्तुगीज राजवटीत राजधानीचा दर्जा मिळाला होता, त्यामुळे स्वतंत्र भारतातीलही पणजी ही सर्वांत जुन्या राजधानीपैकी एक ठरली आहे.
२२ मार्च १८४३ रोजी पणजी शहराच्या डोक्यावर राजधानीचा मुकूट चढवण्यात आला, त्यावेळी रायबंदर व जुने गोवे (वेल्हा सिदाद) हे देखील पणजी शहराचेच भाग होते. त्यावेळी पोर्तुगीज भाषेत पणजीला ‘नोवा गोवा’ असे संबोधण्यात येत असे.
मारिया (दुसरी) ही १८२६ या वर्षी पोर्तुगालची राणी बनली. तिचे पूर्ण नाव ‘मारिया दा ग्लोरिया जोआता कार्लोटा लियोपॉलदिना दा क्रुझ फ्रान्सिस्का झेव्हियर दा पावला इझिदोरा माकाइला गाब्रिएला राफाइला गोन्झागा’ असे लांबलचक होते. राणी बनल्यानंतर १८४३ रोजी तिने पोर्तुगिजांची वसाहत असलेल्या गोव्याची पणजी ही राजधानी बनवली. राणीच्या आदेशानुसार (शाही हुकूमानुसार) तत्कालीन गव्हर्नर जनरल फ्रान्सिस्को शेवियर-द-सिल्वा यांनी पणजी शहराला राजधानीचा दर्जा दिला.
‘सिदाद-द-नोवा गोवा’
जेव्हा पणजी शहराला राजधानीचा दर्जा प्राप्त झाला, तेव्हा पणजी, रायबंदर व जुने गोवे (तेव्हाचे ‘वेल्हा सिदाद’) हा सर्व भाग एक होता व ‘सिदाद-द-नोवा गोवा’ असे त्याचे नाव होते. मात्र, १८४३ साली पोर्तुगिजांनी आपली राजधानी जुने गोवे येथून पणजीत हलवली व तिचे नामकरण ‘नोवा गोवा’ (नवे गोवा) असे केले. पण त्याच्या बर्याच पूर्वी म्हणजे १७५९ सालीच पोर्तुगीज व्हाईसरॉयने पणजीत म्हणजेच तत्कालीन ‘नोवा गोवा’ येथे स्थलांतर केले होते.
‘ग्रिड प्लॅन’ पद्धतीने उभारणी
पोर्तुगीज सरकारने मुळातच निसर्गसौंदर्याने भरलेल्या पणजी शहराची अत्यंत नियोजनबद्धरित्या उभारणी केली. त्यासाठी जुन्या काळी ज्या ग्रीड प्लॅन पद्धतीचा अवलंब करण्यात येत असे, त्या पद्धतीचा अवलंब केला. अत्यंत जुनी संस्कृती असलेल्या ‘मोहंजोदडो’ व ‘हडप्पा’ या शहरांचीही अशाच ग्रिड प्लॅन पद्धतीने उभारणी करण्यात आली होती. सुनियोजित गल्ल्या व एकूणच सुबक व आकर्षक अशी शहराची रचना अशी ग्रिड प्लॅन पद्धतीची वैशिष्ट्ये होत. या पद्धतीने पणजीची उभारणी केल्याने पोर्तुगीज राजवटीत पणजी शहराने कात टाकली होती, मात्र, कालांतराने अति व अनियोजित विकासामुळे पणजी शहराला लाभलेली ही ग्रीड प्लॅन पद्धत धोक्यात आली. मात्र, अजूनही काही भागांत सुनियोजित गल्ल्यांच्या रूपात या ग्रीड प्लॅन पद्धतीचे दर्शन घडते, असे बांधकाम व नियोजन क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
रायबंदर कॉजवे
जुने गोवे येथून रायबंदर मार्गे पणजीला येता यावे यासाठी पोर्तुगिजांनी १६३३-३४ या दरम्यान रायबंदर कॉजवे म्हणजेच बांधसदृश्य पुलाची बांधणी केली होती. मांडवी नदीत भराव घालून हा ३.२ कि. मी. एवढ्या लांबीचा पूल उभारण्यात आला. १६३४ साली जेव्हा या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा संपूर्ण जगातील तो सर्वांत लांब पूल ठरला होता. मांडवी नदीत भराव घालून हा पूल उभारल्याने पोर्तुगीज राजवटीत तर पणजीहून रायबंदर, जुने गोवे आदी ठिकाणी प्रवास करणे सुलभ झालेच, शिवाय १६३४ साली उभारलेला हा कॉजवे अजूनही उभा आहे हे विशेष.