रुग्ण व बळींची संख्या पुन्हा वाढू लागली

0
138

>> ढवळीच्या अनाथाश्रमात कोरोनाचा कहर
>> मुले व शिक्षक बाधित झाल्याने कन्टेनमेंट झोन
>> २४ तासांत राज्यात तीन मृत्यू, ९८ नवे बाधित

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची आणि बळींची संख्या झपाट्याने वाढू लागली असून त्यामुळे गोवा पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार अजूनही हे मान्य करण्यास तयार नसून कमालीच्या बेपर्वाईने वागत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया जनतेमधून उमटू लागल्या आहेत. काल ढवळी येथील एका अनाथाश्रमाच्या वसतिगृहातील शिक्षकांसह मुले कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले असून त्यामुळे सदर वसतिगृहाचा परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करणे भाग पडले आहे. गेल्या २४ तासांत तीन रुग्णांचा कोरोनाने बळी गेला.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रमाणाची राज्य सरकारच्या यंत्रणेकडून योग्य दखल घेतली जात नसल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. मार्च महिन्याच्या २१ दिवसांत राज्यात नवीन १६३७ कोरोना रुग्ण आढळून आले असून २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच काळात नवीन २९४ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गेल्या चोवीस तासांत ९८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याच्या रूग्णांची संख्या १०१३ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ८१८ एवढी झाली आहे.
फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून पणजी, मडगाव, फोंडा या भागात मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळून येत आहेत.

राज्यात मार्च महिन्यात आतापर्यंत ३२ हजार २९८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ५.०६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यात कोविड स्वॅबच्या करण्यात येणार्‍या चाचण्यांमध्ये सरासरी ५ टक्के कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या पाचशेपेक्षा कमी झाली होती. आता पुन्हा एकदा सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजारावर जाऊन पोहोचली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५६,६२३ एवढी झाली आहे. राज्यात तपासणीचे प्रमाण कमी आहे.

ढवळीतील वसतिगृह मिनी कन्टेनमेंट झोन
ढवळी येथील एका अनाथाश्रमाच्या वसतिगृहातील मुले व त्यांचे शिक्षक मोठ्या संख्येने कोरोनाबाधित झाले असून त्यामुळे ती इमारत मिनी कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक आरोग्याधिकार्‍याच्या शिफारशीनुसार हा मिनी कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी पणजीतील प्रमुख वस्तीतील एका इमारतीचा काही भाग मिनी कन्टेनमेंट झोन म्हणून यापूर्वी जाहीर केलेला आहे.

२४ तासांत तिघांचा कोरोनाने बळी
राज्यात कोरोनाने गेल्या २४ तासांत आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मडगाव येथील ६८ वर्षीय पुरुष रुग्ण, बेती येथील ६१ वर्षीय महिला रुग्ण आणि म्हापसा येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना त्यांना जीव गमवावा लागला.

राजधानी पणजीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. या महिन्याच्या प्रारंभी रूग्णसंख्या पन्नासपेक्षा कमी होती. २१ मार्चला पणजीतील रुग्णसंख्या १२३ झाली आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण पणजीत आहेत. मडगाव येथेही कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १०२ झाली आहे. चिंबल आरोग्य केंद्राच्या कक्षेतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. पर्वरीत सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ५४, फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात १०७ रुग्ण, म्हापसा ५० रुग्ण, वास्कोत ६२ रुग्ण, कासावली ५९ रुग्ण, कुठ्ठाळीत ५० रुग्ण, कांदोळी ६२ रुग्ण, शिवोली ३० रुग्ण, पेडणे २५ रुग्ण आहेत. राज्यात दरदिवशी सरासरी केवळ १५०० नमुन्यांची तपासणी होते.