>> महिलांसाठी ३४, इतर मागासवर्गीय २७ प्रभाग राखीव
>> अनुसूचित जाती-जमातींसाठी अनुक्रमे ५ व ८ प्रभाग
मडगांव, मुरगांव, म्हापसा, केपें व सांगे या पाच नगरपालिकांत होणार असलेल्या निवडणुकांसाठी नगरविकास व नगरपालिका प्रशासनाचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी काल महिला, अनुसूचित जाती, अनसूचित जमाती व इतर मागास वर्गीय यांच्यासाठीचे प्रभाग आरक्षण जाहीर केले. त्यासंबंधी काल काढलेल्या अधिसूचनेनुसार सर्व पाचही पालिकांत महिलांसाठी तसेच इतर मागास वर्गीयांसाठी प्रत्येकी एक अतिरिक्त प्रभाग आरक्षित करण्यात आला आहे.
पाचही नगरपालिकांत मिळून महिलांसाठी आरक्षित केलेल्या प्रभांगासाठीची संख्या त्यामुळे आता ३४ वर गेली आहे. तर इतर मागास वर्गीयांसाठी आरक्षित आरक्षित केलेल्या प्रभागांची संख्या २७ वर गेेली आहे. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित केलेल्या प्रभागांची संख्या अनुक्रमे ५ व ८ एवढी झाली आहे.
गेल्या ५ फेब्रुवारी रोजी प्रभाग आरक्षणासंबंधी नगरपालिका प्रशासनाच्या संचालकानी काढलेल्या अधिसूचनेनुसार महिलांसाठी २९, अनुसचित जातींसाठी २ व अनुसूचित जमातींसाठी ५ व इतर मागास वर्गीयांसाठी २२ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. मात्र, विरोधकांनी हे आरक्षण योग्य प्रकारे झाले नसल्याचा दावा केल्यानंतर त्याला उच्च न्यायलयात आव्हान देण्यास आले होते. उच्च न्यायालयाने अर्जधारांच्या बाजूने निवाडा दिल्यानंतर गोवा सरकारने या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयात निवाडा उचलून धरल्याने गोवा सरकारला या आरक्षणासंबंधीची अधिसूचना नव्याने काढावी लागली.
अनुसूचित जाती व जमातींसाठी
प्रत्येकी ३ अतिरिक्त प्रभाग
नव्याने केलेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जाती व जमातींसाठी प्रत्येकी ३ अतिरिक्त प्रभाग मिळाले आहेत.
मडगाव नगरपालिका – मडगाव नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ४, ५, १३, १४, १६, १९, २०, २३ व २५ हे महिलासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. प्रभाग १४ अनुसूचित जातीसाठी, प्रभाग क्रमांक ८ व २३ हे अनुसूचित जमातींसाठी तर प्रभाग क्रमांक २, ४, १०, १६, १७, १९ व २२ हे इतर मागास वर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
मुरगाव नगरपालिका – मुरगाव नगरपालिकेत प्रभाग क्रमांक १, ३, ९, १०, १३, १५, १९, २१ व २४ हे महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तर प्रभाग क्रमांक ९ हा अनुसूचित जातीसाठी तर प्रभाग क्रमांक २४ अनुसूचित जमातींसाठी आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक ३, ६, ८, ११, १९, २२ व २५ हे इतर मागास वर्गीयांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
म्हापसा नगरपालिका – म्हापसा नगरपालिकेत प्रभाग क्रमांक ३, ६, ९, ११, १३, १७ व १८ हे महिलांसाठी, प्रभाग क्रमांक ११ अनुसूचित जाती तर प्रभाग क्रमांक ३ अनुसूचित जमातीसाठी तर १, ६, ७, १०, १२ व १७ हे इतर मागास वर्गीयासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
केपे नगरपालिका – केपे नगरपालिकेत प्रभाग क्रमांक १, ३, ६, ९, १० हे महिलांसाठी तर प्रभाग १० अनुसूचित जाती, प्रभाग ९, १२, १३ अनुसूचित जमाती तर प्रभाग १, २, ६ व ७ हे इतर मागास वर्गीयांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
सांगे नगरपालिका – सांगे नगरपालिकेत प्रभाग- ३, ५, ९ व १० हे महिलांसाठी तर प्रभाग ३ अनुसूचित जाती व प्रभाग १० अनुसूचित जमातींसाठी तर प्रभाग १, ८ व ९ हे इतर मागास वर्गीयांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
निवडणुकीची तारीख
अद्याप नाही ः मुख्यमंत्री
पेडणे, वाळपई, डिचोली, कुंकळ्ळी, कुडचडे-काकोडा व काणकोण या पालिकांसाठी निवडणूक ठरल्यानुसार दि. २० मार्च रोजी होईल. तर मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे व केपे या पाच पालिकांच्या निवडणुकीची तारीख अद्याप ठरली नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मात्र तसे असले तरी या पाच पालिकांसाठीची निवडणूक प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यातील नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जो अवधी दिलेला आहे त्यानुसार या निवडणकीची सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
सर्व पालिकांची मतमोजणी ही एकाच वेळी घेण्यात येणार आहे का असे विचारले असता राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी होणार असल्याचे ते म्हणाले.