बाटला हाऊस चकमकीतील आरोपी अरिझ खानला फाशी

0
145

सन २००८ मधील बाटला हाऊस चकमक प्रकरणातील आरोपी अरिझ खान याला पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा हत्या प्रकरणात दोषी धरून दिल्ली न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. दिल्लीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर आठवड्याभरातच दिल्ली पोलिसांनी बाटला हाऊस येथे कारवाई करून दहशतवाद्यांना ठार मारले होते. त्यावेळी मोहनचंद शर्मा हे पोलीस अधिकारी मारले गेले होते. अरिझ खान हा इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आहे.

अरिझ खान याला फाशी सुनावतानाच न्यायालयाने त्याला ११ लाखांचा दंडही ठोठावला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी अरिझ खान याला शर्मा मृत्युप्रकरणी दोषी धरले होेते.
बाटला हाऊस चकमक प्रकरणी यापूर्वी २०१३ साली सहआरोपी शहझाद याला जन्मठेप झालेली आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या या निवाड्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बाटला हाऊस प्रकरणाचे राजकारण करणारे राजकारणी आता उघडे पडले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. बाटला हाऊस चकमकीबाबत संशय व्यक्त करणार्‍या मंडळींच्या खोटेपणाचा पर्दाफाश झाला असल्याचे ते म्हणाले. सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी वगैरे मंडळींनी आता देशाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.

बाटला हाऊस चकमकीत आतिफ आणि महंमद साजीद हे दोघे दहशतवादी ठार झाले होते. दिल्लीचे पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा हे यावेळी झालेल्या गोळीबारात जखमी झाले होते व नंतर त्यांचा मृत्यू ओढवला. अरिझ खान, शहजाद व जुनैद हे तिघे दहशतवादी तेव्हा पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. महंमद सैफ हा दहशतवादी नंतर पोलिसांना शरण आला होता.

जानेवारी २०१० मध्ये शहजाद याला उत्तर प्रदेशातील आझमगढमध्ये अटक करण्यात आली, तर अरिझ खान हा २०१८ साली भारत – नेपाळ सीमेवर बनवासा येथे पकडला गेला. तिसरा आरोपी जुनैद हा अद्याप फरारी आहे.