- अपूर्वा कर्पे
आजची स्त्री ही सर्व प्रकारचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. पण हे सर्व तिने घर-संसार सांभाळून करणे गरजेचे आहे. स्त्री ही कितीही प्रगल्भ विचारांची असो, मनाने ती कणखर नाही. घर, नात्यांबद्दल ती हळवी आहे. हे नातेसंबंध न तोडता, न दुखावता तिने गगनभरारी घ्यायला हरकत नाही.
आपल्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये मागच्या पिढीपर्यंत स्त्रीची आणि पुरुषाची कर्तव्ये स्पष्ट ठरलेली होती. स्त्रीने घर, कुटुंब, चूल सांभाळायची व पुरुषाने अर्थार्जन करायचे. मागच्या पिढीपर्यंत मुलींच्या मनावर लहानपणापासून हे बिंबवले जायचे की, तुझे शिक्षण, तुझी नोकरी, अर्थार्जन याला तुला प्राधान्य देऊन चालणार नाही. लग्न करून दिलेल्या घरामध्ये तुला सुखा-समाधानाने संसार करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, मुलांवर नीट संस्कार करायचे हे तुझे प्रथम कर्तव्य आहे.
आजच्या पिढीतल्या मुलींना लहानपणापासून शिक्षणाला, करिअरला, स्वत:च्या पायावर उभे राहाण्याला महत्त्व द्यायला शिकवले जाते. एकदा का या सगळ्या गोष्टी पार पडल्या, लग्नाचं वय झालं की पालकांच्या मनावरचा पारंपरिक पगडा पुढे येतो. लग्नानंतर मुलीने सासरी जाणे, त्या घरची रीतीभाती आत्मसात करणे. संसार करताना करिअरमध्ये तडजोडी करणे इत्यादी. यामुळे मुलींच्या आयुष्यात फार मोठे स्थित्यंतर येते. या स्थित्यंतरासाठी त्यांच्या मनाची तयारी नसते. नोकरीतून मिळालेलं आर्थिक स्वातंत्र्य, निर्णयक्षमता त्यांना दुसर्यांच्या पद्धतीने आयुष्य जगण्यापासून रोकते. निर्णयासाठी दुसर्यांबरोबर तडजोड करणे त्यांना रूचत नाही. त्यांची व्यक्तिस्वातंत्र्यामुळे काही मते ठाम झालेली असतात. त्यामध्ये बदल त्यांना नकोसा वाटतो. एकूण काय तर लग्न या संस्थेचा त्यांच्यावर खूप ताण येतो. लग्न म्हणजे बंधन वाटते, आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यावर गंडांतर वाटते. मग त्या लग्नाची टाळाटाळ करू लागतात. कारण नसताना येणार्या स्थळात खोड काढू लागतात.
जसजसे वय वाढू लागते तसतशी जोडीदाराची निवड ही गोष्ट अवघड वाटू लागते. नवतरुण वयामध्ये जो स्वप्नातला राजकुमार असतो तसा वास्तवात कुणी समोर येत नाही, आणि वाढत्या वयात असा कोणी असणं अवघड असल्याचं लक्षात येतं. वाढत्या वयाबरोबर अनुभवातून आलेली काही मते पक्की झालेली असतात. शिवाय आर्थिक सुस्थिरताही आलेली असते. त्यामुळे मुलींना नवीन डाव मांडणे प्रचंड असुरक्षित वाटू लागते.
शंभर टक्के अनुरूप जोडीदार मिळणे ही एक कल्पना आहे. एकत्र राहताना जसजसे सहजीवन फुलत जाते तशी अनुरूपता आकार घेत जाते. एकमेकांच्या सहवासात पती-पत्नी हळूहळू एकमेकांसाठी अनुरूप होतात. यासाठी आपल्या जोडीदाराकडून आपल्याबद्दल काय अपेक्षा आहेत आणि जोडीदाराबद्दल आपल्या नेमक्या काय अपेक्षा आहेत? त्या आपण पूर्ण करू शकणार काय? याबद्दल विचार व्हायला हवा. थोडं आपण बदलू थोडं त्याला बदलू दे असा समजूतदारपणा हवा. संसार म्हटला की तडजोड आलीच. दोघांच्या सामंजस्यातून समस्या सोडवली पाहिजे.
आज कुटुंबे चौकोनी झाली आहेत. स्त्री घर, ऑफिस, मुलं सांभाळते. प्रत्येक घरात स्त्रीचं वर्चस्व आहे. तिचं महत्त्व जाणून तिला योग्य तो मान मिळतो. प्रत्येक गोष्टीत तिचा सहभाग आणि मतांना किंमत आहे. शिक्षणामुळे, यशस्वी करिअरमुळे हातात पैसा आहे. समाजात तिचा मानमरातब वाढला आहे. आजची स्त्री ही सर्व प्रकारचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. पण हे सर्व तिने घर-संसार सांभाळून करणे गरजेचे आहे. स्त्री ही कितीही प्रगल्भ विचारांची असो, मनाने ती कणखर नाही. घर, नात्यांबद्दल ती हळवी आहे. हे नातेसंबंध न तोडता, न दुखावता तिने गगनभरारी घ्यायला हरकत नाही.
परवाच नेटफ्लीक्सवर ‘उंबरठा’ हा चित्रपट पाहण्याचा योग आला. स्त्रीने उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवावे का? उंबरठा ओलांडून ती सुखी होईल का? या प्रश्नांची उत्तरे या चित्रपटातून मिळतात.
चित्रपटाची नायिका सुलभा ही एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत स्त्री. संसारातली एक गृहिणी. सुलभा व सुभाष यांना एक गोड मुलगीही आहे. समाजशास्त्र या विषयाची पदवीधर असलेली सुलभा मात्र आपल्या संसारात ‘सुखी’ नाही. तिला तिच्या शिक्षणाचा उपयोग करायचा आहे. मनासारखे आयुष्य जगता येत नाही म्हणून तिची घुसमट होते. एक दिवस नारी आश्रमात नोकरी करण्याची संधी तिच्याकडे चालून येते. कुटुंब की ध्येय? यामध्ये तिची घुसमट चालू होते. या दोलायमान अवस्थेत ध्येयाने झपाटलेली सुलभा लहानग्या मुलीला न घेता उंबरठा ओलांडून स्त्रीनिकेतनमध्ये जाते.
एकीकडे घरापासून लांब जाऊन, कठोर प्रसंगांचा सामना करत नारी आश्रम सांभाळणारी सुलभा घरची आठवण झाली की डोळ्यांतून अश्रुपात न थांबण्याइतकी हळवी होते. आश्रमातल्या घाणेरड्या राजकारणाला व कमिटीच्या खोट्या आरोपांना कंटाळून सुलभा थोड्या वर्षांनी घरी येते, कायमची म्हणून. सुभाषच्या आयुष्यात आलेल्या दुसर्या स्त्रीबद्दल कळल्यावर मात्र ती अस्वस्थ होते नि निर्धाराने घर सोडून पुन्हा निघून जाते. गगनभरारी मारण्याची इच्छा ठेवणे गैर नाही, पण त्या गोष्टी पूर्णत्वाला नेण्यासाठी नात्यांमधली वीण घट्ट असणे गरजेचे आहे असे हा चित्रपट सुचवतो.