>> इंग्लंडच्या विजयात आर्चरचे ३ बळी, रॉयचे अर्धशतक हुकले
पाहुण्या इंग्लंडने यजमान भारताचा पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात ८ गडी व २७ चेंडू राखून दारुण पराभव केला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने विजयासाठी ठेवलेले १२५ धावांचे माफक लक्ष्य इंग्लंडने केवळ २ गडी गमावून १५.३ षटकांत गाठले.
इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन याने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. शिखर धवन व लोकेश राहुल यांनी डावाची सुरुवात केली. लेगस्पिनर आदिल रशीदने अनपेक्षितपणे डावातील पहिले षटक टाकले. त्याच्या टी-ट्वेंटी कारकिर्दीतील हे केवळ दुसरे पॉवरप्ले षटक होते. यापूर्वी २०१५ साली न्यूझीलंडविरुद्ध त्याने पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करताना आपल्या एकमेव षटकात १६ धावा दिल्या होत्या. परंतु, काल केवळ २ धावा देत त्याने झकास सुरुवात केली. जोफ्रा आर्चरने आपल्या पहिल्या व डावातील दुसर्या षटकाच्या दुसर्या चेंडूवर राहुलचा त्रिफळा उडवला. राशिदने आपल्या दुसर्या षटकात विराट कोहलीला तंबूची वाट दाखवली. कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर धवन बाद झाला. आर्चरने त्याला बाद केले. मार्क वूड याने आपल्या वेगाने त्याला चकवा देत त्याच्या यष्ट्या वाकवल्या. ऋषभ पंतने काही आकर्षक फटके मारले. परंतु, वूडच्या वेगाने त्याला हैराण केले. त्याला अपेक्षित फटकेबाजी करणे शक्य झाले नाही. २३ चेंडू खेळून त्याने २१ धावांचे योगदान दिले. भारताच्या टी-ट्वेंटी क्रिकेट इतिहासातील दुसरी सर्वांत कमी पॉवरप्लेमधील धावसंख्या कालच्या सामन्यात झाली. भारताने ३ गडी गमावून केवळ २२ धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध २०१६ साली ढाका येथील ३ बाद २१ ही भारताची पॉवरप्लेमधील नीचांकी धावसंख्या आहे. पाचव्या स्थानावरील श्रेयस अय्यर याने ४८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६७ धावा करत भारताला शतकी वेस ओलांडून देण्यात मोलाचे योगदान दिले. पाचव्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येताना भारताकडून तिसर्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या अय्यरने केली. सर्वाधिक धावांचा विक्रम मनीष पांडे (नाबाद ७९, वि. द. आफ्रिका, सेंच्युरियन, २०१८) याच्या नावावर आहे. यानंतर युवराज सिंग (नाबाद ७७, वि. ऑस्ट्रेलिया, राजकोट, २०१३) याचा क्रमांक लागतो.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने वेगवान सुरुवात केली. बटलर व रॉय यांनी केवळ ८ षटकात ७२ धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. इंग्लंडकडून सलामीवीर जेसन रॉयने ३२ चेंडूंत ४९ धावा चोपल्या. रॉय परतल्यानंतर मलान व बॅअरस्टोव यांनी अधिक पडझड होऊ न देता संघाला विजयी केले. भारताने या सामन्यासाठी रोहित शर्माला विश्रांती दिली. सूर्यकुमार यादव व इशान किशन या नवोदितांना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी देण्याचे टाळताना कोहली व संघ व्यवस्थापनाने सावध पवित्रा अवलंबला. मालिकेतील दुसरा सामना रविवार १४ रोजी खेळविला जाणार आहे.
धावफलक
भारत ः शिखर धवन त्रि. गो. वूड ४, लोकेश राहुल त्रि. गो. आर्चर १, विराट कोहली झे. जॉर्डन गो. रशीद ०, ऋषभ पंत झे. बॅअरस्टोव गो. स्टोक्स २१, श्रेयस अय्यर झे. मलान गो. जॉर्डन ६७, हार्दिक पंड्या झे. जॉर्डन गो. आर्चर १९, शार्दुल ठाकूर झे. मलान गो. आर्चर ०, वॉशिंग्टन सुंदर नाबाद ३, अक्षर पटेल नाबाद ७, अवांतर २, एकूण २० षटकांत ७ बाद १२४
गोलंदाजी ः आदिल रशीद ३-०-१४-१, जोफ्रा आर्चर ४-१-२३-३, मार्क वूड ४-०-२०-१, ख्रिस जॉर्डन ४-०-२७-१, बेन स्टोक्स ३-०-२५-१, सॅम करन २-०-१५-०
इंग्लंड ः जेसन रॉय पायचीत गो. सुंदर ४९, जोस बटलर पायचीत गो. चहल २८, डेव्हिड मलान नाबाद २४, जॉनी बॅअरस्टोव नाबाद २६, अवांतर ३, एकूण १५.३ षटकांत २ बाद १३०
गोलंदाजी ः अक्षर पटेल ३-०-२४-०, भुवनेश्वर कुमार २-०-१५-०, युजवेंद्र चहल ४-०-४४-१, शार्दुल ठाकूर २-०-१६-०, हार्दिक पंड्या २-०-१३-०, वॉशिंग्टन सुंदर २.३-०-१८-१