पश्चिम बंगालमध्ये नंदिग्राम येथे प्रचार करत असताना आपल्याला चार पाच जणांनी धक्काबुक्की केली. त्यामुळे आपल्या पायाला दुखापत झाली असून हा आपल्यावर कट रचून हल्ला करण्याचा प्रयत्न होता असा आरोप तृणमूल कॉंग्रेस प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी घटनास्थळी पोलीस नव्हते. छातीत दुखत असल्याचेही यावेळी ममता बॅनर्जी यांनी सांगितले. दरम्यान, भाजपने ममता बॅनर्जींचे आरोप फेटाळत हे सगळे सहानुभूती मिळवण्यासाठी नाटक असून निवडणूक आयोगाने या घटनेची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
आपल्यावर ४ ते ५ जणांनी हल्ला केला. आपण कारजवळ पोहोचल्यावर काही जणांनी आपला पाय चिरडला, असे यावेळी ममता म्हणाल्या.
पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी कैलास विजयवर्गीय आणि भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचे आरोप फेटाळून लावले आहेत. ज्या प्रकारे ममता बॅनर्जींना पोलीस संरक्षण असते ते बघता त्यांच्या कार्यकर्त्यांवरही कुणी हल्ला करू शकत नाही. पण खराच जर हल्ला झाला असेल तर या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी कैलास विजयवर्गीय यांनी केली आहे.