खांडेकर-कुसुमाग्रज-बोरकर अनोखा त्रिवेणी संगम

0
209
  • राम देशपांडे

भाऊंनी पन्नास वर्षांहून अधिक काळ मराठी साहित्याच्या क्षेत्रावर अधिराज्य केले. स्वतःचा असा एक वेगळा ठसा मराठी मनावर कायमचा उमटवला. मात्र त्यांचे लेखन आणि त्यांचे दैनंदिन जीवन, माणसावर मनस्वी प्रेम, माणुसकीवरील नितांत श्रद्धा, लेखनाच्या क्षेत्रात काहीतरी नवीन करू पाहणार्‍यांना (त्यांनी मागणी केली तर) योग्य ते मार्गदर्शन, वडिलकीच्या नात्याने धोक्याचा कंदील दाखविण्याचे तसेच योग्य असा सल्ला द्यायचे काम भाऊंनी केले. त्याचप्रमाणे साहित्याच्या क्षेत्रात काही ना काही वेगळेपण आपल्या साहित्यकृतीतून- मग ते नाटक असू दे, कथा-कादंबरी असू दे किंवा अन्य कोणताही लेखन-प्रकार असू दे- त्याबाबत सतत मार्गदर्शन करत आले. अनेक लेखकांचे- प्रारंभीच्या काळात लेखन त्यांनी आवडीने आणि चिकित्सक दृष्टीने वाचून मार्गदर्शन केले. त्यांचे साहित्य वाचकांपर्यंत पोचायला हवे या दृष्टीने प्रयत्न केले. प्रसंगी पदरमोड करून त्यांचे लेखन ग्रंथरूपाने वाचकांसमोर आणले. कुसुमाग्रज, बोरकर, पाडगावकर, सुशीला पगारिया हे आणि असे बरेच लेखक आपल्या परिचयात्मक लेखनातून रसिक-वाचकांसमोर आणले. बा. भ. बोरकर हे त्यांचे आवडते कवी. मला आठवतं- एका स्मरणिकेचा लेख लिहून, मुद्रणप्रत तयार होऊन आठ दिवस त्यांच्या फाईलमध्ये पडून होता. कारण काय तर योग्य शीर्षक गवसत नव्हते. आणि एका सकाळी मी लेखनासाठी गेलो तेव्हा तो फाईलमधला लेख पुन्हा वाचला आणि म्हणाले, ‘‘घ्या शीर्षक. बोरकरांच्या कवितेचीच ओळ आज मला एकदम आठवली.’’
ज्वालेविण जळती जे| त्यांचे सर्वस्व खुजे|
सौख्य खुजे, दुःख खुजे| धूरचि मागे न पुढे|
कवितेच्या या ओळीतील नेमकी भाऊंनी ओळ घेतली- ‘ज्वालेविण जळती जे’
असे बोरकर भाऊंचे आवडते कवी. अधूनमधून बोरकरांना ते पत्र लिहायचे. त्या पत्रात नव्या लेखनाविषयी जशी चौकशी करायचे तसेच ‘महात्मायन’ हे खंडकाव्य त्यांच्या हातून लिहून पूर्ण व्हायलाच हवे हा ध्यास भाऊंनी घेतला होता. अशाच एका पत्रात भाऊ लिहितात-
…तुम्ही महात्मायनाच्या चिंतनात व लेखनात मग्न असाल अशी अपेक्षा करतो. एरव्हीचं लेखन हे तळ्यात किंवा नदीत पोहण्यासारखं असतं. मोठे लेखनसंकल्प समुद्रासारखे असतात. जितकं आत अधिक जावं तितका विस्तार मोठा; सौंदर्य मोठे; क्षितिज अदृश्य अशी स्थिती असते. तुमच्या मनातल्या या महाकाव्याचा सारा सुगंध शब्दबद्ध होऊन सतत दरवळत राहावा ही माझ्यासारख्या तुमच्या शेकडो स्नेह्यांची व चाहत्यांची इच्छा आहे.
तुमचा,
भाऊ खांडेकर
१६ जुलै १०७१
मात्र हेच भाऊ मला पुढे वेगळ्याच मनःस्थितीत दिसले. नेमकं कारण काय असावं ते कळायला मार्ग नाही. मात्र हेच भाऊसाहेब खांडेकर तत्त्वचिंतकाच्या भूमिकेतून बोरकरांना लिहितात-
…आपण दैववादी नसलो तरी एखादवेळी प्रतिकूल गोष्टी हात धुवून मागं लागल्यासारखा पाठपुरावा करतात. ६३ लिहायला जावं तर ३६ चा आकडा उमटतो. मी, माझ्या आणि इतर अनेकांच्या आयुष्यात ते बघत आलो आहे.
एकीकडून तुमची काव्यशक्ती आणि सौंदर्यशक्ती, दुसरीकडे विश्‍वचालक शक्तीवरील असीम श्रद्धा या तुम्हाला अशावेळी मनाचा तोल सावरायला मदत करतात, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध जीवनाला आवश्यक असलेल्या या तोलाला मुकत चालला आहे हे मानवतेचं मोठं दुर्दैव आहे. मी शरीरानं हॉस्पिटलस्थ असलो तरी मनानं वानप्रस्थ आहे.
तुमचा
भाऊ खांडेकर

६ ऑगस्ट १९७१

खांडेकर-बोरकर-कुसुमाग्रज हा अनोखा त्रिवेणी संगम होता. एकमेकांविषयी मनात अपार आनंद तर होताच, पण त्याबरोबर या तिघांच्याही जीवनाकडे पाहिले तर हा तीन स्वच्छ, पारदर्शी मनांचा त्रिवेणी संगम होता. माणसावर प्रेम करणं, त्यांच्या जीवनाशी, सुख-दुःखाशी एकरूप होणं आणि त्यातून स्फुरलेलं लेखन हे मराठी वाचकांना भरभरून दिलंय, हे कधीच विसरता येणार नाही. बोरकर-खांडेकर यांच्या पत्रसंवादाविषयी लिहीत असताना कुसुमाग्रजांनी आपल्या एका कवितेत व्यक्त केलेल्या बोरकरांविषयीच्या सद्भावाचे आगळे-वेगळे दर्शन घडले. वाटलं, ज्या कवितेनं मला आनंद दिला, हा आनंद इतरांसाठी मनमुराद वाटण्यातही एक वेगळाच आनंद नाही का? आता दिवसेंदिवस आनंद घेणे, आनंद देणे आणि आपल्याला झालेला आनंद भरभरून वाटणे हे फार कमी झालेय, म्हणूनच हे या कवितेविषयीचं अप्रूप!
कुसुमाग्रज कवितेतून कवी बाकीबाब (बा. भ. बोरकर) यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करताना लिहितात-
…आणि आता बाकीबाबही

  • आणि आता बाकीबाबही
    आमच्या काव्याकाशातील पुनवेचा चंद्र
    चांदणं जगणारा, चांदणं उधळणारा,
    केवळ मातीतच नव्हे तर रेताडातही
    चांदण्याची रोपं पेरणारा.
    बाकीबाब, आठवतंय?
    ती तुम्हाला चेष्टेनं महर्षी म्हणायची,
    पण काव्याच्या प्रांतातील तुमचं महर्षीपण
    हे एक वास्तवच होतं.
    अशेष जीवनाची कविता करण्याची
    तुमची ती साधना-सायुज्जभक्ती-
    साधारणांना अप्राप्यच.
    तशा आपल्या पायवाटा वेगळ्याच
    पण माझ्या खांद्यावरील तुमचा हात
    कधीच सैल झाला नाही.
    बाकीबाब,
    तुम्ही नाशिकला आला होता
    माझ्या शब्दासाठी,
    तेव्हाच्या भाषणात तुम्ही म्हणालात-
    ‘मी या माणसांसाठी इथे आलोय,
    आता माझं मागणं एकच आहे
    मी बोलावीन तेव्हा, माझ्यासाठी
    त्यानं यायला हवं- कुठेही, केव्हाही-’
    बाकीबाब,
    आता तुमचं बोलावणं
    आणि माझं येणं
  • सारंच परस्वाधीन
    (कुसुमाग्रजांची ही कविता केवळ रसिकवाचकांसाठी ‘थांब सहेली’ या वसंत पाटील, श्री. शं. सराफ, रेखा भांडार यांनी संपादित केलेल्या कवितासंग्रहातून साभार. हा संग्रह कुसुमाग्रज प्रतिष्ठानसाठी पॉप्युलर प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केला. या दोघांचेही मनःपूर्वक आभार!)