पुडुचेरीत काल अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पुडुचेरीमधील कॉंग्रेस सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार होते. मात्र त्यापूर्वी हे सरकार कोसळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. मात्र अल्पमतात असणारे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी सरकार ठरावाला सामोरे जाण्याआधीच कोसळले.
कॉंग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ कॉंग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत खाली आले होते. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणसामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण बहुमत सिद्ध न करता आल्याने कॉंग्रेसचे सरकार कोसळले. अध्यक्षांनी सरकार अल्पमतात असल्याचे जाहीर केले. यानंतर नारायणसामी यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला.