>> टी-२० मालिका; कॉन्वेचे शतक हुकले
डेवॉन कॉन्वेचे एका धावेने हुकलेले शतक आणि ईश सोधीच्या जादुई फिरकीच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा पहिला टी-२० सामन्यात ५३ धावांनी पराभव करीत घरच्या मैदानावर सुरू असलेल्या पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळाल्यानंतर न्यूझीलंडने डेवॉन कॉन्वेच्या ९९ धावांच्या खेळीच्या जोरावर ५ गडी गमावत १८४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. कॉन्वेने आपल्या ९९ धावांच्या अर्धशतकी खेळीत ५९ चेंडूंचा सामना करताना १० चौकार व ३ षटकार खेचले. ग्लेन फिलिप्सने ३०, जेम्स नीशमने २६ तर कर्णधार केन विल्यम्सने १२ धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल सॅम्स व झाय रिचटर्डसन यांनी प्रत्येकी २ तर मार्कुस स्टॉईनिस यांने १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडच्या सूत्रबद्ध मार्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १३१ धावांवर गारद झाला. त्यांच्या मिचेल मार्शने सर्वाधिक ४४ धावा तर ऍश्टन ऍगरने २३, ऍडम झम्पाने १३, मॅथ्यू वेडने १२ तर झाय रिचर्डसनला ११ धावा धावा जोडता आल्या. इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. त्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. न्यूझीलंडकडून ईश सोधीने २८ धावांत महत्त्वाच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. टिम साऊथी व ट्रेंट बौल्ट यांनी प्रत्येकी २ तर कायल जेमिसन आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.