एफसी गोवाची आज ईस्ट बंगालशी लढत

0
204

सातव्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शुक्रवारी एफसी गोवा आणि एससी ईस्ट बंगाल यांच्यात लढत होईल. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना होईल.
बाद फेरीची चुरस शिगेला जात असताना तिसर्‍या क्रमांकावरील गोव्याला फॉर्म मिळाला आहे. गेल्या सहा सामन्यांत ते अपराजित असून यातील तीन लढती त्यांनी जिंकल्या आहेत. ईस्ट बंगालविरुद्ध मात्र त्यांचा कस लागेल. पहिल्या पसंतीचे केंद्रीय बचावपटू इव्हान गोंझालेझ आणि जेम्स डोनाची यांच्या अऩुपस्थितीत त्यांना खेळावे लागेल. केरला ब्लास्टर्सविरुद्ध १ -१ अशी बरोबरी झालेल्या आधीच्या लढतीत गोंझालेझला मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यामुळे निलंबित आहे, तर डोनाची याला दुखापत झाली आहे. मुख्य प्रशिक्षक जुआन फरांडो यांचीही अनुपस्थिती असेल. ते सुद्धा निलंबित आहेत. सहाय्यक प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांनी मात्र अशा गोष्टींची चिंता वाटत नसून संघाची वाटचाल योग्य दिशेने सुरु असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, अपराजित मालिकेची सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे नव्या प्रशिक्षकांशी संघाने जुळवून घेतले आहे. आधीचे खेळाडू आणि आता असलेले खेळाडू यांच्यातील बदल बघता ते कधीही सोपे नसते. आम्ही फेरीगणिक लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने आणि प्रशिक्षकांच्या अपेक्षेनुसार खेळ करण्याच्यादृष्टिने पावले टाकत आहोत.
या दोन संघांमधील मोसमाच्या प्रारंभी १-१ अशी बरोबरी झाली होती. त्यात ब्राईट एनोबाखरे याने ईस्ट बंगालसाठी एकट्याने पुढाकार घेत सनसनाटी गोल केला होता. रॉबी फाऊलर यांच्या संघाने सर्वांत कमी ११ गोल केले असूनही नायजेरियाच्या या खेळाडूने तेव्हापासून सर्व सामन्यांत मोठा प्रभाव पाडला आहे. गोवा मात्र केवळ ब्राईट याच्यावरच लक्ष केंद्रीत करेल असे नाही.

मिरांडा यांनी सांगितले की, ब्राईट हा चांगला खेळाडू आहे यात शंकाच नाही. त्याने ईस्ट बंगालच्या कामगिरीत सुधारणेला चालना दिली आहे. आम्ही मात्र एका विशिष्ट खेळाडूला रोखण्याची कोणतीही योजना आखलेली नाही किंवा तसा विचार नाही. याचे कारण आम्ही एकावर लक्ष एकवटले तर मैदानावरील इतर नऊ जण आम्हाला धक्का देऊ शकतात. आम्ही आमच्या शैलीनुसार खेळ करू.

ईस्ट बंगालची सात सामन्यांची अपराजित मालिका मुंबई सिटीविरुद्ध संपली. त्यामुळे उसळी घेऊन पुन्हा अपराजित राहण्याचा त्यांचा निर्धार असेल. मुंबई सिटीविरुद्ध पराभव झाला असला तरी ईस्ट बंगालने चेंडूवरील ताब्यात वर्चस्व राखले आणि अखेरच्या मिनिटापर्यंत आव्हान राखले. गोव्याचे प्रमुख खेळाडू खेळणार नसल्यामुळे ईस्ट बंगालचे सहाय्यक प्रशिक्षक टोनी ग्रँट यांना फॉर्मातील प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजयाच्या संधीची खात्री वाटते.
एव्हर्टन आणि मँचेस्टर सिटीचे माजी मध्यरक्षक असलेले ग्रँट म्हणाले की, विजयी मार्गावर परतण्याची संधी नक्कीच मिळाली आहे. आम्हाला मोसमाच्या प्रारंभीच कर्णधार डॅनिएल फॉक्स याला मुकावे लागले आणि हे प्रतिकूल ठरले. दोन सरस खेळाडू नसलीतल तर प्रत्येक संघाला झगडावे लागते.

गोव्याने हैदराबाद एफसीकडून लोनवर बचावपटू आदिल खान याला घेतले आहे. तो पदार्पण करणार का हा उत्सुकतेचा मुद्दा असेल. आदिलच्या मूळ क्लबमधील सहकारी आणि अर्जूुन पुरस्कार विजेता सुब्रत पॉल याला अशाच पद्धतीने घेण्यात आले आहे. तो १२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ईस्ट बंगालसाठी खेळण्याची अपेक्षा आहे.