तिस्क-उसगावात अपघात; दोन ठार

0
207

तिस्क – उसगाव येथून धारबांदोड्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या कारची रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला ठोकर बसून दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात तिस्क उसगाव येथील राजदीप राजेंद्र नाईक (३०) व आपेव्हाळ – प्रियोळमधील सर्वेश रामदास गावडे (२७) हे दोघेजण ठार झाले तर एकजण सुदैवाने बचावला. हा अपघात मंगळवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास पिळये – तिस्क येथे घडला.
अपघातानंतर तिघांनाही इस्पितळात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र राजदीप व सर्वेश यांचे निधन झाले होते. तर कारमधील शुभम सोमनाथ गावस हा धारबांदोड्यातील युवक सुदैवाने बचावला.

तिस्क येथून जीए ०४ सी ५१११ या कारने हे तिघेही धारबांदोड्याला जात होते. प्रजासत्ताकदिनानिमित्त मंगळवारी धारबांदोडा येथे क्रिकेट स्पर्धा होती. या स्पर्धेला हे तिघेही उपस्थित होते. सामने संपल्यानंतर रात्री तिस्क-उसगाव येथे हॉटेलात तिघे जेवले व धारबांदोडा येथे शुभमला पोचवण्यासाठी कारने निघाले होते. त्यावेळी राजदीप हा कार चालवत होता. यावेळी नियंत्रण गेल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात कोसळून बाजूच्या झाडाला जोरदार ठोकर दिली.

फोंडा पोलीस उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर यांनी निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा केला व शवचिकित्सेनंतर राजदीप नाईक व सर्वेश गावडे या दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. उपलब्ध माहितीनुसार दोघेही अविवाहित आहेत.