राज्य सरकारकडून नवीन मोटर वाहन कायद्यात वाहतूक नियमभंगासाठी कमीतकमी दंडाची तरतूद करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने निश्चित केलेली दंडाच्या रकमेची जशाच तशी अंमलबजावणी करण्यास विरोध झाला आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना वाहतूक मंत्री गुदिन्हो म्हणाले की, नवीन मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीसंबंधी नवीन प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे. वाहतूक नियमभंगासाठी कमीत कमी दंडाची तरतूद केली जाणार आहे अशी माहिती गुदिन्हो यांनी दिली.
उबर मोटोला मान्यता नाही
राज्यात उबर मोटो या ऍप आधारित मोटरसायकल सेवेला मान्यता देण्यात आलेली नाही. या उबर मोटोवर कारवाई करण्याबाबत विचारविनिमय केला जात आहे, असेही वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
पणजी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पाटो येथील बहुमजली पार्किंग इमारतीचा पूर्णपणे वापर होणे आवश्यक आहे. कॅसिनो कर्मचारी, सरकारी व खासगी कामगारांनी पाटो येथे वाहन पार्किंगची सोय करून त्यांना शहरात आणण्यासाठी खास मिनी बसगाड्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. पणजीतील धिम्यागतीने चालविण्यात येणार्या मिनी बसगाड्यांच्या वाहतुकीकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.