राज्यात चार दिवसांनंतर आणखी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद काल झाली आहे. नवीन ५५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ७५७ झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ७१२ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ८६५ एवढी झाली आहे.
बांबोळी येथे गोमेकॉमध्ये राय सालसेत येथील ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी १६ जानेवारीला तीन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.
राज्यातील आणखीन ५४ कोरोना रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५१ हजार ०९० झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याची प्रमाण ९६.९२ टक्के एवढे आहे.
कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ७७ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन २२ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. चोवीस तासांत नवीन १७४८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी झाली. पणजी परिसरातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ८९, पर्वरीतील ६६ तर मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ९७ आहे.
लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यात
राजकीय नेत्यांना कोरोना लस
देशामध्ये कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दि. १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचार्यांबरोबरच पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आता दुसर्या टप्प्यामध्ये राजकीय नेत्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार यांच्याबरोबरच इतर आजार असणार्या राजकीय नेत्यांचे लसीकरण केले जाणार आहे. यात अनेक नेते हे ८० वर्षांहून अधिक वयाचे असून त्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एच. डी. देवगौडा, भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा समावेश आहे. लसीकरणाचा हा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. यामध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणार्या मंत्री, नेते, यांना लस देण्यात येईल. सध्या लोकसभेत तीनशेहून अधिक नेते तर राज्यसभेमधील २०० हून अधिक खासदार हे पन्नाशी ओलांडलेले आहेत.