विल्यम्सच्या गोलमुळे एटीकेएमबी विजयी

0
191

ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षीय बदली खेळाडू डेव्हिड विल्यम्स याने नोंदविलेल्या एकमेव गोलमुळे एटीके मोहन बागानने चेन्नईन एफसी संघावर १-० अशी मात करीत हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या पर्वात विजयासह पूर्ण गुणांची कमाई केली. विल्यम्स याने अखेरच्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी झाली. आघाडी फळीतील ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षीय बदली खेळाडू डेव्हिड विल्यम्स याने हा गोल केला. मध्य फळीतील जेव्हीयर हर्नाडेझ याने घेतलेल्या कॉर्नरवर त्याने हेडिंगवर फिनिशिंग केले. अखेरच्या क्षणी चेन्नईनचा गोलरक्षक विशाल कैथ याचा अंदाज चुकला.

एटीकेएमबीचे प्रशिक्षक अँटोनिओ लोपेझ हबास यांनी ६७व्या मिनिटाला मध्य फळीतील कार्ल मॅक्‌ह्युज याच्याऐवजी विल्यम्सला आघाडी फळीत पाचारण केले होते. संघाचे आक्रमण भक्कम करीत चेन्नईयीनवर दडपण आणण्याचा त्यांचा निर्णय अचूक ठरला.
एटीकेएमबीचा हा १२ सामन्यांतील सातवा विजय असून तीन बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे २४ गुण झाले आहेत. त्यांचे दुसरे स्थान कायम राहिले. त्यांना करता आले आहेत, पण त्यांच्याविरुद्ध केवळ पाच गोल झाले आहेत. मागील सामन्यात एफसी गोवाविरुद्ध एटीकेएमबीला १-१ अशी बरोबरी साधावी लागली होती, तर त्याआधी मुंबई सिटीविरुद्ध एकमेव गोलने पराभव झाला होता. त्यामुळे हा निकाल एटीकेएमबीसाठी महत्त्वाचा ठरला.

मुंबई सिटी एफसी ११ सामन्यांतून २६ गुणांसह आघाडीवर आहे. तिसर्‍या क्रमांकावरील एफसी गोवा संघाचे १२ सामन्यांत १९ गुण आहेत. हैदराबादचा चौथा क्रमांक असून १२ सामन्यांत त्यांचे १७ गुण आहेत.
चेन्नईनला १२ सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व सहा बरोबरी अशा कामगिरीसह तत्यांचे १५ गुण व सहावे स्थान कायम राहिले.