अफगाणिस्तानने पहिल्या एकदिवसीय सामन्यात काल गुरुवारी आयर्लंडचा १६ धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानच्या २८७ धावांना उत्तर देताना आयर्लंडला ९ बाद २७१ धावांपर्यंतच मजल मारणे शक्य झाले. या विजयासह अफगाणिस्तानने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
सलामीवीर रहमनुल्ला गुरबाज व जावेद अहमदी यांनी अफगाणिस्तानला १२० धावांची सलामी दिली. सामनावीर ठरलेल्या गुरबाज याने वनडे पदार्पणात १२७ धावांची खेळी केली. ८ चौकार व तब्बल ९ षटकारांनी त्याने आपली खेळी सजवली. मधली फळी कोलमडल्यानंतर तळाला नजिबुल्ला झादरान याने २९ व अष्टपैलू राशिद खान याने ५५ धावांची खेळी केली. आयर्लंडकडून अँडी मॅकब्रायन याने २९ धावांत ५ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडचे गडी ठराविक अंतराने बाद होत राहिले. त्यामुळे त्यांना आवश्यक धावगती राखता आली नाही. लोरकान टकर याने सर्वाधिक ८३ धावा जमवल्या. कर्टिस कॅम्फर (३९), हॅरी टेक्टर (२८), पॉल स्टर्लिंग (३९), सिमी सिंग (२३) यांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करणे शक्य झाले नाही.