अमित वर्माच्या कर्णधारी खेळीच्या जोरावर गोव्याने इंदोरमध्ये सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ‘डी’ गटात काल विदर्भवर १६ धावांनी मात करीत पूर्ण गुण प्राप्त केले. गोव्याने आतापर्यंत या स्पर्धेत ५ सामने खेळलेले असून त्यापैकी तीन जिंकलेले आहेत. एमेराल्ड हायस्कूलच्या मैदानावर हा सामना खेळविला गेला.
गोव्याचा कर्णधार अमित वर्माने काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व ६ गडी गमावत १५६ अशी धावसंख्या उभारली. कर्णधार अमित वर्माने ८ चौकार व ३ षटकारांच्या सहाय्याने ४६ चेंडूंत ७२ धावांची दमदार नाबाद अर्धशतकी खेळी केली. स्नेहल कौठणकरने ३५, दर्शन मिसाळने नाबाद १३ तर अमोघ देसाईने १२ धावा जोडल्या. विदर्भकडून यश ठाकूरने ३, आदित्य ठाकरेने २ तर दर्शन नळकांडेने १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात खेळताना गोव्याच्या सूत्रबद्ध गोलंदाजीमुळे विदर्भला ८ गड्यांच्या मोबदल्यात १४० धावांपर्यंतच मजल मारता आली. फेलिक्स आलेमाव व लक्षय गर्ग यांच्या धारदार गोलंदाजीसमोर विदर्भच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यांच्या अक्षय कर्नेवारने सर्वाधिक ३१ धावा केल्या. अपूर्व वानखडेने २७, अक्षय वाडकरने २१, मोहित राऊतने १५ तर जितेश शर्माने १० धावा जोडल्या. अन्य फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. गोव्याकडून फेलिक्स आलेमावने ३, लक्षय गर्गने २ तर विजेश प्रभुदेसाई व दर्शन मिसाळ यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः गोवा, २० षटकांत ६ बाद १५६, (एकनाथ केरकर ८, आदित्य कौशिक ३, अमोघ देसाई १२, स्नेहल कौठणकर ३५, अमित वर्मा नाबाद ७२, सुयश प्रभुदेसाई १, लक्षय गर्ग ७, दर्शन मिसाळ नाबाद १३ धावा. दर्शन नळकांडे १-४१, आदित्य ठाकरे २-१८, यश ठाकूर ३-३६ बळी) विजयी वि. विदर्भ, २० षटकांत ८ बाद १४०, (जितेश शर्मा १०, सिद्धेश वठ ९, यश राठोड ६, अक्षय वाडकर २१, मोहित राऊत १५, अपूर्व वानखडे २७, अक्षय कर्नेवार ३१, दर्शन नळकांडे २, यश ठाकूर नाबाद १, आदित्य ठाकरे नाबाद ४ धावा. लक्षय गर्ग २-२८, विजेश प्रभुदेसाई १-२१, फेलिक्स आलेमाव ३-२७, दर्शन मिसाळ १-२६ बळी).