राममंदिर ते राष्ट्रमंदिर

0
256
  • दत्ता भि. नाईक
    लोगो- इतिहासाच्या पाऊलखुणा

श्रीराम मंदिराच्या परिसरात शिक्षण, आरोग्य इत्यादींसाठी आधुनिक पद्धतीच्या व्यवस्था प्रस्थापित करण्यात आल्या आहेत. मंदिराप्रमाणेच अयोध्यानगरीत श्रीरामाची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. राममंदिराच्या निर्मितीच्या माध्यमाने राष्ट्रमंदिराच्या कीर्तीवर कळस चढवण्याचे काम या घटनेमुळे होणार आहे.

शनिवार दि. ९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सर्वश्री अशोक भूषण, शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, एस. अब्दुल नझीर या सर्व न्यायमूर्तींसहित सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पंचसदस्यीय अभ्यासनाने एकमताने अयोध्येतील रामजन्मभूमी मालकी हिंदूंच्या ताब्यात देण्याचा निर्णय दिला. शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या विवादावर यामुळे पडदा पडला. योगायोगाची गोष्ट म्हणजे तीस वर्षांमागे १९८९ मध्ये याच दिवशी अयोध्येत शिलापूजन झाले होते व त्याच दिवशी जर्मनीला विभाजित करणारी बर्लिनची भिंत पाडली गेली होती. या निकालानुसार अयोध्या परिसरातील मुस्लीम समाजाकरिता मशिदीच्या उभारणीसाठी पाच एकरांचा भूखंड देण्याचाही आदेश देण्यात आला. देशाच्या सांस्कृतिक इतिहासाला योग्य अशी कलाटणी देणारा हा दिवस होता. अखिल भारतीय सुन्नी वक्फ बोर्डाने ताबडतोब या निर्णयावर मत व्यक्त केले नाही, परंतु बैठकीनंतर निर्णयाला विरोध न करण्याचा निर्णय घेतला. तर उत्तर प्रदेशच्या राज्य सुन्नी वक्फ बोर्डाने निर्णयाला विरोध न करण्याचा ताबडतोब निर्णय घेतला. राज्य वक्फ बोर्ड हीच संस्था या विषयातली दुसरी बाजू सांभाळत होती.

गुरू गोविंदसिंग यांचा पराक्रम
भारतावर आक्रमण करणार्‍या बाबरच्या आदेशावरून त्याचा सेनापती मीर बाकी याने अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर असलेल्या मंदिराचा विद्ध्वंस १५२८ साली केला. सशस्त्र मोगलांच्या सेनेसमोर बर्‍याच प्रमाणात निःशस्त्र व तुटपुंजी युद्धसामग्री असलेल्या हिंदूंचा टिकाव लागला नाही. तरीही हिंदूंनी माघार घेतली नाही. या वेळेस एक लाख तेहतीस हजार हिंदू धारातीर्थी पडले असे कनिंगहेम हा इतिहासकार लिहितो. औरंगजेबाच्या काळात तर अत्याचाराचा अतिरेक झाला. त्याच्या आदेशावरून काशीचे विश्‍वनाथ व मथुरेचे कृष्णमंदिरही पाडण्यात आले. त्याने अयोध्योत लोकांच्या येण्या-जाण्यावरच बंदी घातली. त्यामुळे पुनः जोरदार संघर्ष सुरू झाला. यापूर्वी हुमायून व अकबराच्या काळातही हिंदूंनी राममंदिर परत मिळवण्यासाठी संघर्ष केला. औरंगजेबाच्या काळात संघर्षही प्रखर झाला. अयोध्येवर मूकपणे कब्जा करण्याकरिता त्याने सरयू नदीच्या मार्गे सेनादले पाठवली. बाबा वैष्णवदास हे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य. त्यांची दहा हजार चिमटाधारी साधूंची सेना तयार होती. त्यांनी प्रतिहल्ला केल्यामुळे औरंगजेबाच्या सेनेला माघार घ्यावी लागली. औरंगजेब तेवढ्यावर थांबला नाही. त्याने सय्यद हसन अली याला पन्नास हजारांची सेना देऊन पुन्हा अयोध्येवर पाठवले. या खेपेस बाबा वैष्णवदास यांनी शीख संप्रदायाचे दहावे गुरू श्रीगुरू गोविंदसिंग यांना मदतीला बोलावले. त्यावेळेस शिखांची सेना आग्रा येथे होती. त्यांनी लगेच त्यांचा मोहरा अयोध्येच्या दिशेने वळवला. अयोध्येच्या जवळ रुदाली येथे गुरू गोविंदसिंग यांच्या सेनेने मोगलांच्या सेनेला सळो की पळो करून सोडले. माघारी फिरणार्‍या मोगलांना त्यांनी सदतगंज येथे त्यांची उरलीसुरली मस्ती जिरवली. १६६४ मध्ये औरंगजेब स्वतः मोठी सेना घेऊन अयोध्येवर चालून आला. या खेपेस तो वरचढ ठरला व त्याने रामचबुतराही खणून उद्ध्वस्त केला.

अयोध्येचा तिसरा नवाब शुजा उद्दौला याला अफगाणांच्या विरोधात लढण्यासाठी मराठ्याचे सहाय्य हवे होते. १७५६ साली त्याने पेशव्यांशी तह केला. त्यावेळेस पेशव्यांच्या प्रतिनिधीने अयोध्येसह तीन पवित्र स्थळे मुक्त करण्याची मागणी केली होती व ती मान्यही करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात हस्तांतर घडून आले नाही. नंतर आलेल्या नवाबांनी पुनः अत्याचाराचे सत्र चालूच ठेवले.

रामलल्ला विराजमान
रामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी एकूण ७६ लढाया झाल्याचा उल्लेख मिळतो. १८५७ साली देश इंग्रजांविरुद्ध पेटून उठला होता. अयोध्येच्या परिसरातील गोंडा नरेश देवीबख्थसिंग, बाबा रामचरणदास, बाबा उद्धवदास तसेच अमीर अली यांनी एकजुटीने इंग्रजी सत्तेविरुद्ध युद्ध पुकारले. अमीर अलीने अयोध्या व फैजाबाद येथील सर्व मुसलमानांना आवाहन केले की, आपल्या देशातील सर्व मुसलमान विदेशी लोकांचे वंशज नसून आपले सर्वांचे पूर्वज भारतीय आहेत. रामजन्मभूमी हे हिंदूंचे श्रद्धास्थान असल्यामुळे आपण ते त्यांना परत करणे योग्य ठरेल. इंग्रजांना राज्य करायचे असेल तर त्यांना ही ऐक्याची भावना परवडणारी नव्हती. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा पाडाव केल्यानंतर १८ मार्च १८५८ रोजी अयोध्येतील कुबेर किल्ल्यावरील एका चिंचेच्या झाडावर बाबा चरणदास आणि अमीर अली यांना इंग्रजांनी फासावर लटकावले.

सन १८५९ मध्ये इंग्रज सरकारने कुंपण बांधून आतील भाग मुसलमानांना व बाहेरील भाग हिंदूंना दिला. १८८५ मध्ये या बाबतीतला पहिला खटला दाखल केला गेला. महंत रघुवरदास यांनी फैजाबाद न्यायालयासमोर विनंती ठेवली की, ज्या चौथर्‍यावर मूर्ती ठेवून हिंदू पूजा करतात तेथे मंदिर बांधण्यासाठी परवानगी द्यावी. ही मागणी न्यायालयाकडून फेटाळली गेली तरी हा विषय कायद्याच्या चर्चेच्या कक्षेत आला.

१९३४ साली झालेल्या दंगलसदृश्य वादावादीनंतर चबुतर्‍यावर श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली व त्यानंतर या स्थानावर कधीच नमाज पढला गेला नाही. १९४९ साली २४ डिसेंबरला पहाटे चार वाजता ढाच्यामध्ये रामलल्लाची मूर्ती प्रगट झाली. त्या दिवशी अबुलबख्श नावाचा हवालदार पहार्‍यावर होता. त्याने जिल्हा मेजिस्ट्रेट के. के. नायर यांच्यासमोर साक्ष देताना सांगितले की, मध्यरात्र उलटून गेल्यावर मला आतमध्ये प्रकाश दिसला व त्यानंतर चार वाजेपर्यंत एक सुंदर बालकाची मूर्ती आत असल्याचे माझ्या लक्षात आले. मंदिरास लावलेले कुलूप तसेच राहिले तरी सकाळी पूजा करण्याकरिता पंडितास आत जाण्याची परवानगी होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीमध्ये फैजाबादचे जिल्हा मेजिस्ट्रेट के. के. नायर यांची भूमिका फार महत्त्वाची आहे.

अखेरीस ढाचा उद्ध्वस्त
१९८४ मध्ये विश्‍व हिंदू परिषद या हिंदूंच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने धर्मसंसद भरवून रामजन्मभूमी मुक्तियज्ञ समितीची स्थापना केली. त्यानंतर एकात्मता यात्रा व गंगाजल यात्रांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे पूर्ण देश ढवळून निघाला. १९८६ च्या १ फेब्रुवारी रोजी फैजाबाद जिल्हा न्यायालयाच्या मेजिस्ट्रेटच्या लक्षात आले की, मंदिराला कुलूप लावण्याचा कोणत्याही न्यायालयाचा आदेश नाही. त्यानुसार रामजन्मभूमीचे कुलूप तोडण्याचा आदेश देण्यात आला. तेव्हापासून मंदिरात रामभक्तांची सतत वर्दळ सुरू झाली.

रामशिलापूजन हा या निमित्ताने आयोजिलेला सर्वात मोठा कार्यक्रम होता. देशभरातील सुमारे तीन लाखाहून जास्त गावांमध्ये हा विषय गेला व अयोध्येत शिलापूजनही झाले. याचा अर्थ या ठिकाणी मंदिर उभारले जाणार हे निश्‍चित झाले. १९८९ साली केंद्रात राजीव गांधी यांचे व उत्तर प्रदेशात नारायण दत्त तिवारी यांचे सरकार होते. दोन्ही सरकारे कॉंग्रेस पक्षाचीच होती.

भारतीय जनता पार्टीने सर्व प्रकारचे निर्बंध तोडून या विषयात भाग घेतला. २५ सप्टेंबर १९९० रोजी भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवानी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा सुरू केली. ती रथयात्रा बिहारमधील समस्तीपूर येथे लालुप्रसाद यादव यांच्या सरकारने अडवली. त्याचा परिणाम म्हणून भाजपाने केंद्रातील विश्‍वनाथ प्रतापसिंह यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. अडवानींच्या रथयात्रेमुळे रामजन्मभूमी आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाले व भारतीय जनता पार्टीची ‘व्होट बँक’ आकार घेऊ लागली.
३० ऑक्टोबर १९९० हा देवोत्थान एकादशीचा दिवस. या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचा कडेकोट बंदोबस्त तोडून कारसेवक ढाच्याच्या शिखरावर चढले. यावेळी झालेल्या गोळीबारात कोलकात्याचे कोठारी बंधू मृत्यू पावले. त्यानंतर कित्येकांची प्रेते सरयू नदीमध्ये सापडली.
६ डिसेंबर १९९२ म्हणजे गीताजयंती. महाभारतीय युद्धाचा दिवस. धर्माचा विजय निश्‍चित करणारा. या दिवशी संतप्त कारसेवकांनी बाबरी ढाचा उद्ध्वस्त केला. यावेळेस छोट्याशा गोव्यातून चारशे सत्तावीस कारसेवक सहभागी झाले होते.

समझोत्याचे प्रयत्न विफल
२००५ च्या १५ मार्चपासून मंदिर बांधणीसाठी अयोध्येत पुन्हा कारसेवकांना जमवण्यात आले. त्यातील परतीच्या प्रवासात साबरमती एक्स्प्रेसच्या एस- ७ या बोगीला गोद्रा येथे आग लावण्यात आली. त्यात महिलांसह कारसेवकांना जिवंत जाळले गेले. या गोद्रा येथे घडलेल्या घटनेमुळे गुजरातमध्ये प्रचंड दंगल उसळली.
२००३ साली झालेल्या उत्खननात या ठिकाणी पुरातन मंदिराचे अवशेष मिळाल्यामुळे तिथे पूर्वी मंदिर होते हे सिद्ध झाले. उत्खनात सहभागी झालेले श्री. के. के. महमूद यांनी याबाबतीत स्पष्ट मत व्यक्त केले आहे. ३० सप्टेंबर २०१० रोजी उत्तर प्रदेश न्यायालयाच्या अलाहाबाद खंडपीठाने जो निकाल दिला त्याप्रमाणे विवादित २.७७ एकर भूमीचे तीन तुकडे पाडून त्यातील प्रत्येकी रामलल्ला विराजमान, निर्मोही आखाडा व सुन्नी वक्फ बोर्ड यांना देण्यात आले. त्यानंतर दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फकीर मोहमद इब्राहिम कलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली समझोता घडवून आणण्यासाठी समिती नेमण्यात आली. या समितीवर बेंगळुरूच्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री. रविशंकर व श्रीराम पाचू हे वकील यांचा सदस्य म्हणून अंतर्भाव होता. १३ जुलै २०१९ रोजी या समितीने कोणत्याही प्रकारचा समझोता होऊ शकणार नसल्याचे निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवले. यानंतर हा खटला दररोज चालावा म्हणून खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेल्या वातावरणनिर्मितीचा बराच वाटा आहे.

रामराज्याचा आदर्श
श्रीरामाच्या मंदिराच्या बांधकामाचा संपूर्ण खर्च उचलण्यास तयार असलेले कित्येक धनवान मिळतील, परंतु ते मंदिर त्यांच्या नावावर ओळखले जाईल म्हणून सामान्य माणसांपासून धनवंतांपर्यंत सर्वजणांकडून काही ना काही दान घ्यावे असे ‘रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या ट्रस्टमार्फत ठरले आहे. कन्याकुमारीचे विवेकानंद मंदिरही याच पद्धतीने उभारले गेले होते.

वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांनी मंदिराचा आराखडा १९८७ साली बनवला होता. मागणीनुसार त्यात बदल करण्यात आलेले आहेत. मंदिरे कशाला हवीत, कोणता तरी सामाजिक प्रकल्प उभारा म्हणणार्‍यांनाही यातून उत्तर मिळालेले आहे. मंदिराच्या परिसरात शिक्षण, आरोग्य इत्यादींसाठी आधुनिक पद्धतीच्या व्यवस्था प्रस्थापित करण्यात आल्या आहेत. मंदिराप्रमाणेच अयोध्यानगरीत श्रीरामाची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे.
श्रीराम हे भारतीय समाजजीवनावर खोलवर परिणाम घडवणारे दैवत आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सर्वजणांसमोर रामराज्याचाच आदर्श होता. महात्मा गांधीनी आपला आदर्श म्हणजे रामराज्य आहे असे वेळोवेळी सांगितले आहे. पित्याच्या वचनासाठी सम्राटपद त्यागणारा राजा विश्‍वात अन्य कोणत्याही देशात झाला नाही. माता कैकेयी जेव्हा रुसून बसली तेव्हा ‘हे देवी, तुझ्या मनात काय आहे ते मला सांग, राम दोनदा बोलत नाही,’ असे स्पष्टपणे सांगणारा राम. मी आणि सीता अभिन्न आहोत असे वेळोवेळी सांगणारा व वनवासाच्या चौदा वर्षांच्या काळात कोणत्याही नगरामध्ये पायही न ठेवणारा राम. रामाने मनुष्यरूपाने दैवी आदर्श प्रस्थापित केले. कलियुगात देशात मोठमोठी साम्राज्ये प्रस्थापित झाली तरी कुणीही रामाचा आदर्श मोडला नाही व ज्यांनी मोडला त्यांची साम्राज्ये क्षणात कोसळली. सर्व शीख गुरू, राणा प्रताप, शिवाजी महाराज इत्यादींसमोर श्रीरामाचाच आदर्श होता.
राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या दिशेने देशाला नेणारी ही घटना आहे. आत्मविस्मृत अमृतपुत्राला त्याच्या शक्तीची व बुद्धीची जाणीव करून देणारी घटना म्हणजे राममंदिराची उभारणी. आधुनिक काळात त्यांनी देशाला विश्‍वगुरू व आत्मनिर्भर बनण्यासाठी जो संदेश दिलेला आहे याचा परिपाक आता दिसून येत आहे. राममंदिराच्या निर्मितीच्या माध्यमाने राष्ट्रमंदिराच्या कीर्तीवर कळस चढवण्याचे काम या घटनेमुळे होणार आहे यात तीळमात्र शंका नाही.