नववर्ष शुभेच्छा!

0
143


नवे वर्ष नवे आशांकुर घेऊन आले आहे. कोरोनाच्या कहराने झाकोळलेल्या सन २०२० ची पडछाया जरी या नव्या वर्षावर असली तरी देखील त्यावरील लशींच्या उत्पादनास जगभरात प्रारंभ झालेला असल्याने महामारीचे हे जागतिक संकट या वर्षी विरून जाईल अशी अपेक्षा आहे.
अनेक दशकांनंतर आलेल्या महामारीने आपले सर्वांचे जीवन गतवर्षी ढवळून काढले. भौतिक सुखासीन आयुष्य जगणार्‍या माणसाला सन २०२० ने गदगदा हलवले. जमिनीवरच आणले म्हणाना! विज्ञान – तंत्रज्ञानाच्या गमजा मारणार्‍या मानवाला अजूनही तुम्ही पराधीन आहात, सगळे ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेले नाही याची जाणीव निसर्गाने करून दिली आणि हाती पैसा आहे म्हणजे आपण जग जिंकल्याच्या उन्मादात वावरणार्‍या मानवाला धन हे नाही, तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे याची आठवणही सरत्या वर्षाने आयुष्यभर धडा राहील अशा रीतीने करून दिली आहे.
अनेक आमूलाग्र बदल मावळत्या वर्षाने सर्व समाजस्तरांतील मानवाच्या आयुष्यात घडवले. पैशामागे वेड्यासारखे दिवसरात्र धावणार्‍या मनुष्याला कोरोनाने थांबवले आणि कौटुंबिक जीवनाचे महत्त्व त्याच्या मनावर ठसवले. जीवनात केवळ पैसा महत्त्वाचा नाही, तर जीवनाला अर्थपूर्णता आणणार्‍या साहित्य, कला, संगीत आदी गोष्टीही किती नितांत आवश्यक असतात आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या नकळत घडोघडी कसा आनंद पेरत असतात याची जाणीवही या सरत्या वर्षाने मानवाला करून दिली. कोरोनाने ह्या सर्व अवांतर गोष्टींवर आटोकाट बंधने आली. सार्वजनिक कार्यक्रमांवर मनाई झाली, अहोरात्र घरात कोंडून घेणे अपरिहार्य बनले आणि माणसांच्या जीवनातील अर्थपूर्ण गोष्टींना तो मुकल्यागत झाला. मग त्याला या सारया गोष्टींचे आणि माणसांचे महत्त्व उमगले. केवळ रोजच्या चार जीवनावश्यक गोष्टींनी आपण माणसासारखे जगू शकत नाही. जीवनाला अर्थपूर्णता आणण्यासाठी आणखीही काही गोष्टींची आवश्यकता असते हे त्याला कळून चुकले.
माणसे घरोघरी कोंडली गेली, हताश झाली, निराश झाली, परंतु त्यातूनही शेवटी त्यांनी मार्ग काढला. मानवानेच निर्मिलेले तंत्रज्ञान त्याच्या मदतीला धावून आले. ‘ऑनलाइन’ हा परवलीचा शब्द बनला. शिक्षणापासून सांस्कृतिक उपक्रमांपर्यंत ‘ऑनलाइन’ ने त्याला तारले. कोणतीही गोष्ट नवी असते तेव्हा हबकायला होते, परंतु नंतर त्याचा सराव होतो तसे कोरोनाच्या बाबतीत झाले. माणसे कोरोनालाही सरावली. कधी न वापरलेले सॅनिटायझर्स, कधी न वापरलेले मास्कस्, सामाजिक दूरीचे पालन या सर्व गोष्टींना हळूहळू का होईना खेड्यापाड्यांतील गोरगरीब माणसेही सरावल्याचे दिसले.
कोरोनाशी झुंजारपणे लढा देणारे योद्धे आघाडीवर होते. त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता, स्वतःच्या मुलाबाळांच्या आरोग्याची चिंता न करता निःस्पृहपणे आघाडीवर राहून लढा दिला. या सरत्या वर्षाच्या अखेरीस खरे समाजनायक कोण असतील तर हे कोरोनायोद्धेच आहेत, ज्यांनी या संकटातून तुम्हा आम्हाला सावरले. त्या सर्वांना मानाचा मुजरा! या काळामध्ये सामाजिक कार्याचा आदर्श दाखवणार्‍या सोनू सूदसारख्या व्यक्तींनी जे काम केले आहे, ते निव्वळ अनमोल आहे, प्रेरणादायी आहे.
कोरोनाने माणसांचा किड्यामुंग्यांसारखा बळी घेतला हे तर खरेच, परंतु त्याच्याशी लढता येते, झुंजता येते हा आत्मविश्वासही माणसाला या महामारीत आला आहे. प्लेग, देवीसारख्या महामारींविषयी आमच्या पिढ्यांनी केवळ वाडवडिलांकडून ऐकले होते, वाचले होते. पण गतवर्षी महामारी काय असते हे प्रत्यक्ष अनुभवता आले. हा अनुभव पुढील संकटांना सामोरे जात असताना नक्कीच उपयोगी पडणार आहे. मागचे संपूर्ण वर्ष काळवंडलेल्या स्थितीत गेले. हे नववर्ष मात्र निश्‍चित चांगले असेल हा विश्वास आज समाजात पेरण्याची आवश्यकता आहे. कोरोनानंतरचे ‘न्यू नॉर्मल’ आपण सर्वांनी अंगात बाणवून घेतले आहेच. यापुढील काळामध्येही त्याचे पालन करणे अपेक्षित आहे आणि आवश्यकही. अजून संकट कुठे पुरते टळले आहे? कोरोना नवे अवतार धारण करून पुन्हा गळ्याशी फास आणू पाहतो आहे. त्याच्याशी निर्धाराने आणि हिंमतीने मुकाबला करायचा आहे. सार्वजनिक जीवनातील बेफिकिरी यापुढे चालणार नाही. आपली बेफिकिरी केवळ इतरांचे जीवनही संकटात ढकलत असते हे विसरले जाऊ नये. गेले वर्षभर कोरोनाविषयी ही जनजागृती आम्ही आमच्या परीने करीत आलोच आहोत. यापुढेही करीत राहणार आहोत. परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही, त्यामुळे नवप्रभा तूर्त मर्यादित पानांच्या स्वरूपातच प्रकाशित होणार आहे, परंतु आपल्या सोबत सर्वशक्तीनिशी आम्ही यापूर्वीही होतो आणि यापुढेही राहू हा विश्वास जरूर बाळगावा. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!