राज्यात काल शुक्रवारी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. कोरोनामुळे बळी गेलेल्यांची एकूण संख्या ७२८ आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले काल ८० नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ५०,५३४ एवढी झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या ९८० एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६२ टक्के झाले आहे. तसेच काल राज्यात १०१ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ४८,८२६ झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. काल खात्यातर्फे १६६९ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली.
कोरोना संसर्ग झालेल्या १४,१९१ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २६,४३० जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ३,८९,८७९ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.
दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक ९५ रुग्ण असून फोंड्यात ७० व केपे इथे ६३ रुग्ण आहेत. उत्तर गोव्यातील पणजीत ७४ तर पर्वरीत ५८ रुग्ण उपचार घेत असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.
उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे २७५ खाटा रिक्त झाल्या आहेत. तर दक्षिण गोव्यातील ६० पैकी ४३ खाटा रिक्त असून तिथे १७ जण उपचार घेत आहेत. काल कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या २७ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर २५ जणांनी इस्पितळात विलगीकरणात राहण्याचे ठरवले.
ब्रिटनहून काणकोणात आलेले
पाच प्रवासी कोरोनाबाधित
ब्रिटनहून एकाच विमानाने काणकोणात आलेल्या १६ प्रवाशांपैकी पाच प्रवासी कोरोनाबाधित सापडले असल्याची माहिती काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राचे डॉ. तावारीस यांनी दिली. त्यातील दोन प्रवासी दाबोळी विमानतळावरच बाधित सापडले होते.
कोरोनाबाधित सापडलेल्या पाचही जणांना सध्या घरीच विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. त्यांना उपचारासाठी इसआय इस्पितळात पाठविण्यात येणार आहे. ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांमध्ये माशे येथील ४, मास्तीमळ येथील ३, श्रीस्थळ येथील२, शेळेर, पोळे, बेतूल, पाळोळे, पैंगीण, पणसुले व भाटपाल येथील प्रत्येकी एक प्रवासी आहे. कोरोनाबाधित सापडलेल्यांमध्ये तीन महिला व दोन पुरुष आहेत. दोन प्रवाशांचा अहवाल आज उपलब्ध होणार असल्याचे आरोग्य केंद्रातून सांगण्यात आले.