>> ‘त्या’ ११ जणांचे अहवाल पुण्याला पाठवले
कोरोना विषाणूचे नवे रूप आढळल्यानंतर ब्रिटनमधून आलेल्या ११ पर्यटकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गोव्यासाठी तो चिंतेचा विषय ठरलेला असतानाच या रूग्णांच्या लाळेचे नमुने आता पुढील तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले. या रुग्णांना नव्या रूपातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला आहे की काय हे पुण्यातून अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत व आरोग्यमंत्री राणे यांनी काल स्पष्ट केले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी या घडीला राज्यात संचारबंदी लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले.
सध्या तरी राज्यात कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कोणती मार्गदर्शक तत्त्वे येतात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. ब्रिटनमधून आलेल्या ज्या पर्यटकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी आता पुण्याला पाठवले असून नव्या रूपातील कोरोना विषाणूचा त्यांना संसर्ग झाला आहे की काय हे पुणे येथील प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच कळणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
विलगीकरणाची सूचना
गेल्या एका आठवड्यापासून गोव्यात आलेल्या ब्रिटनस्थित पर्यटकांवर आरोग्य खाते लक्ष ठेवून असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या सर्व पर्यटकांना रुग्ण विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आली असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. या पर्यटकांमध्ये कोरोनाची जराशीसुद्धा लक्षणे दिसून आल्यास त्यांना इस्पितळात हलवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
११ जण बाधित : आरोग्यमंत्री
ब्रिटनमधून आलेल्या पर्यटकांपैकी ११ पर्यटकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आढळून आले असल्याचे काल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले. प्रथम ९ पर्यटकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आढळले. त्यानंतर आणखी दोन पर्यटक तपासणीसाठी आले असता तेही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याचे राणे म्हणाले.
ब्रिटनमधून आलेल्या व कोरोनाचा संसर्ग असलेल्या या रुग्णांना मडगाव येथील ईएसआय इस्पितळात ठेवण्यात येणार असल्याची माहिती राणे यांनी दिली. ब्रिटनमधून आलेल्या रुग्णांचा धोका लक्षात घेऊन सरकार विशेष काळजी घेत आहे. या रुग्णांना कुणाच्या जास्त संपर्कात येऊ न देता वेगळ्या ठिकाणी ठेवावे लागणार असल्यानेच त्यांना ईएसआय इस्पितळात ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
९७९ पर्यटकांची तपासणी
९ डिसेंबरनंतर ब्रिटनमधून गोव्यात आलेल्या ९७९ पर्यटकांची कोविडसाठीची आरटीपीसीआर चाचणी चालू असल्याची माहितीही राणे यांनी दिली. राज्यात आरटीपीसीआर किट्सचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी सुमारे एक लाख आरटीपीसीआर किट्स मंजूर केले जावेत अशी मागणी आरोग्य खाते राज्य सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१० वी, १२वीच्या अंतिम
परीक्षांच्या तारखा जाहीर
गोवा शालांत मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार गोवा बोर्डाची दहावीची होणारी परीक्षा १३ मे २०२१ पासून सुरू होणार आहे. तर इयत्ता बारावीची परीक्षा दि. २६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. दरम्यान ही परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे मंडळाने कळविले आहे. कोरोना महामारीमुळे जवळजवळ सहा महिने शाळेचे वर्ग बंद होते. त्यानंतर दि. २१ नोव्हेंबरपासून सामाजिक अंतराचे व इतर मार्गदर्शक तत्वांचे पालन करून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यास शिक्षण खात्याने परवानगी दिली होती.मंडळाच्या या आदेशानंतर राज्यातील विद्यालयांनी कोरोना नियमांचे पालन करत वर्ग घेण्यास सुरूवात केली आहे. यंदा कोरोना महामारीमुळे अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य न झाल्याने ३० टक्के अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे.