>> नवनिर्वाचित सदस्य अधिकारग्रहणप्रसंगी मुख्यमंत्र्यांची घोषणा
उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी दोन्ही जिल्ह्यांत जिल्हा पंचायत भवने बांधण्यात येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे मंत्रालयात बोलताना दिली. नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्यांना शपथ देण्यासाठी आयोजित केलेल्या शपथग्रहण कार्यक्रमानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. उत्तर तसेच दक्षिण या दोन्ही जिल्हा पंचायतींना स्वतःची अशी वास्तू नाही. उत्तर जिल्हा पंचायतीचे कार्यालय हे येथील जुन्ता हाऊसमध्ये आहे, तर दक्षिण जिल्हा पंचायतीचे कार्यालय हे मडगावच्या जुन्या जिल्हाधिकारी इमारतीमध्ये आहे. त्यामुळे दोन्ही जिल्हा पंचायतींसाठी एक-एक स्वतंत्र जिल्हा पंचायत भवन उभारण्याचा विचार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
जिल्हा पंचायत सदस्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता तेथे मानवी विकास कसा होईल याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्यांच्या शपथग्रहण सोहळ्यात यावेळी केले. आपण केवळ आपल्या मतदारसंघात गटारे व रस्ते बांधणे यावरच लक्ष केंद्रित करू नका. तेथील मानवी विकासाकडेही लक्ष द्या, असे आवाहन सावंत यांनी केले.
गरीब, दारिद्य्ररेषेखालील लोक, शेतकरी, विशेष लोक आदींसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोचतील याकडे लक्ष द्या, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना जिल्हा पंचायत सदस्यांना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या ‘उम्मीद’ या योजनेचा उल्लेख करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी दरवर्षी प्रत्येक पंचायतीला दीड लाख रु. एवढा निधी देण्यात येत असल्याचे सांगितले.
पंचायत संचालनाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला पंचायतमंत्री माविन गुदिन्हो हेही हजर होते. यावेळी या सर्व जिल्हा पंचायत सदस्यांना त्यांचे हक्क, अधिकार व कर्तव्ये याविषयी माहिती देण्यात आली. जिल्हा पंचायत सदस्यांना लवकरच आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहितीही सावंत यांनी यावेळी दिली. दरम्यान, सरकारने एका अधिसूचनेद्वारे दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपद तर उत्तर गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्षपद महिला सदस्यांसाठी राखीव ठेवले आहे.