निरस शुभारंभ

0
231

गोवा मुक्तीच्या हीरकमहोत्सवाचा राष्ट्रपतींच्या उपस्थितीतील वर्षारंभ सोहळा निराशाजनक होता. तयारीला मोजकेच दिवस मिळूनही लखलखाट आणि झगमगाट करण्यात आयोजक कमी पडले नाही हे खरे, परंतु गुणवत्तेच्या दृष्टीने एकूण कार्यक्रम मात्र ज्या उंचीवर जायला हवा होता त्याच्या पासंगालाही गेला नाही. अर्ध्यावरच तोडलेला व चुकीच्या उच्चारांनी भरलेला तथाकथित माहितीपट, राष्ट्रपती न पाहताच निघून गेले ते ठराविक पठडीतले सांस्कृतिक कार्यक्रम, सूत्रसंचालकांनी केलेला ताळतंत्र नसलेला अवतरणांचा मारा व चुकीचे उच्चार, ठराविक मंडळींची सांस्कृतिक कार्यक्रमांत लागलेली वर्णी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोडले तर सर्व उपस्थितांची रूक्ष भाषणे यांनी हा समारंभ अक्षरशः कंटाळवाणा झाला. राष्ट्रपतींना लिहून देण्यात आलेले भाषणदेखील गोवेकरांनाच गोवा मुक्तीचा इतिहास ऐकवणारे एखाद्या शाळकरी निबंधासारखे अतिशय निरस होते.
शिष्टाचारमंत्री मावीन गुदिन्हो यांना तर हा कार्यक्रम म्हणजे एखादी राजकीय सभा वाटली की काय नकळे, परंतु त्यांचे संपूर्ण भाषण राजकीय सभेत केल्यासारखे व संपूर्णपणे शिष्टाचाराला सोडून होते. राष्ट्रपतींच्या उपस्थितीतील अशा प्रकारच्या कार्यक्रमाला सर्वसमावेशक, बिगरराजकीय स्वरूप आले पाहिजे हे भान स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पुरेपूर राखल्याचे त्यांच्या भाषणांतून पाहायला मिळाले, परंतु मावीन गुदिन्हो आणि श्रीपाद नाईक यांची भाषणे पूर्णतः राजकीय स्वरूपाची होती. मावीन यांनी आपल्या सरकारची भलावण काय केली, राष्ट्रपतींना आपल्या पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुका जिंकल्याचे काय सांगितले, श्रीपादभाऊंनी भारतीय जनता पक्षाचेच गुणगान काय गायिले, शेतकरी आंदोलनाचा राजकीय विषय काय मांडला, गोवा मुक्ती हीरकमहोत्सवी सोहळ्यातून जे गतइतिहासाचे जागरण व्हायला हवे होते, ते काही होताना दिसले नाही. नाही म्हणायला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यसैनिकांचे प्रकर्षाने स्मरण केले व पं. नेहरूंच्या गोवा मुक्तीतील योगदानाचाही आवर्जून उल्लेख केलेला दिसला. मुख्यमंत्र्यांचे भाषणही संयत आणि हा कार्यक्रम बिगरराजकीय आहे याचे भान राखणारे होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे भाषण विनोदाचा स्पर्श असलेले आणि दिलखुलास होते. देशभरातील जनतेने गोवा मुक्तीलढ्यामध्ये योगदान दिलेले आहे याची जाणीव त्यांनी यावेळी करून दिली. मुळातच राजकारण्यांनी खच्चून भरलेली आयोजन समिती पाहता या कार्यक्रमाकडूनही फार अपेक्षा नव्हती आणि जी काही होती तिची पूर्तताही झाली नाही.
स्वातंत्र्यसैनिकांनाच या सोहळ्याची निमंत्रणे मिळाली नसल्याची कैफियत मांडावी लागली ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट होती. मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यामध्ये लक्ष घालून नुसती ओळखपत्रे दाखवूनही स्वातंत्र्यसैनिकांना कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला जाईल असे शेवटी जाहीर केले, तरीही या स्वातंत्र्यवीरांची जी मानखंडना व्हायला नको होती ती झालीच. कार्यक्रमाचा एकमेव सांगण्यासारखा विशेष म्हणजे गोव्याच्या पोर्तुगीजपूर्व इतिहासावर त्यात देण्यात आलेला भर. आजवर कधी अशा प्रकारे पोर्तुगीजपूर्व इतिहास मांडला गेलेला नव्हता, जो या कार्यक्रमातून आग्रहपूर्वक मांडला गेला. राष्ट्रपती मध्येच उठून जाणार असल्याचे ठाऊक होते, तर सांस्कृतिक कार्यक्रमात मध्येच रसभंग न होऊ देता योग्य प्रकारे नियोजन का केले गेले नाही हे कळले नाही. किमान राष्ट्रपतींनी राजशिष्टाचार सोडून सर्व कलाकारांसमवेत एक सामूहिक छायाचित्र घेतले हाच काय तो बिचार्‍या कलाकारांना दिलासा.
हीरकमहोत्सवाचा शुभारंभी कार्यक्रम पार तर पडला, परंतु त्यातून काय साध्य झाले हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. गोवेकरांनीच पाहिलेल्या फुगड्या, चपय आणि घोडेमोडणीवर किती लाख उधळले गेले आहेत याचा हिशेब आता कोण देणार आहे? येत्या वर्षभराचे जे नियोजन समोर ठेवण्यात आलेले आहे ते अतिशय उथळ आणि केवळ उधळपट्टी आणि खिरापतखोरीचेच दिसते. देशाच्या विविध राज्यांमध्ये गोवा महोत्सवांच्या नावाखाली आपापल्या मतदारसंघातील कलापथकांचे सरकारी खर्चाने दौरे आखल्याने आणि कोकणी भाषेतील तथाकथित ‘अक्षरग्रंथ’ प्रकाशित केल्याने गोव्याचे काय भले होणार आहे? हीरकमहोत्सवाचे रिंगटोन ऐकवण्यापेक्षा गोव्याचा हीरकमहोत्सव खर्‍या अर्थाने साजरा करायचा असेल तर गोमंतकीयांच्या मूलभूत सुविधांकडे सरकारने लक्ष द्यावे. जागोजागी खड्डे पडलेले रस्ते, सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा, या सगळ्या मूलभूत समस्यांच्या पूर्ततेवर हा निधी खर्चिला तर किमान सार्थकी लागेल. हीरक महोत्सवाच्या नावाखाली ऋण काढून सण साजरा करण्याचा हा प्रकार किती अनावश्यक आणि अस्थानी आहे याची चाहुल शुभारंभी कार्यक्रमातूनच लागली आहे एवढे मात्र खरे!