राष्ट्रपती कोविंद दिल्लीला रवाना

0
236

गोवा मुक्तिदिनाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आलेले भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद काल रविवारी संध्याकाळी ७ वा. दिल्लीला रवाना झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे गोव्यात शनिवारी दुपारी आगमन झाले होते.

शनिवारी संध्याकाळी गोवा मुक्तिदिनाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमांचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. तसेच काल रविवारी सकाळी इतर मंत्री नेत्यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर संध्याकाळी ४.३० वाजता रताळगाव येथून हेलिकॉप्टरने दाबोळी हंस तळावर आगमन झाले. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर राष्ट्रपतींनी जुने म्हार्दोळ येथे महालसा मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सुलक्षणा सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी दाबोळी विमानतळ ते वेर्णा जुने म्हार्दोळपर्यंत राष्ट्रीय महामार्ग आणि इतर ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच संपूर्ण वाहतूक सुमारे एक तास बंद ठेवण्यात आली होती. देव दर्शन झाल्यानंतर राष्ट्रपतींचे ६.३० वा. दाबोळी हंस तळावर आगमन झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. सावंत, सौ. सावंत, सभापती राजेश पाटणेकर, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मुख्य सचिव परिमल राय आदी उपस्थित होते. नंतर राष्ट्रपती खास विमानातून ७ वाजता रवाना झाले.