दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानी पक्षातील नाराज नेत्यांसोबत स्वतः सोनिया गांधी यांनी बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीनंतर चार राज्यांमध्ये पक्ष, संघटनेतील फेरबदलांना सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात महाराष्ट्र, तेलंगण, गुजरात आणि मध्य प्रदेश या चार राज्यांमध्ये फेरबदल करण्यात येणार आहेत. यानुसार हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या पराभवाची आणि खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत तेलंगणमधील कॉंग्रेस प्रदेशाध्य अध्यक्ष उत्तमकुमार रेड्डी यांनी तर गुजरातमध्ये पोटनिवडणुकीतील पराभवामुळे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते असलेल्या कमलनाथ यांच्यावरही प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जात आहे.
महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर कॉंग्रेस हायकमांडने पुन्हा विश्वास टाकला आहे. बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेतेही आहेत.
कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आसाम आणि केरळसाठी तीन अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव नेमले आहेत. तिथे पुढच्या वर्षाच्या सुरवातीलाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. नवनियुक्त सचिव दोन्ही राज्यांतील प्रभारी सरचिटणीसांना मदत करतील. जितेंद्र सिंह हे आसामचे प्रभारी सरचिटणीस आणि तारिक अन्वर हे केरळचे प्रभारी सरचिटणीस आहेत.
गोव्यात अध्यक्षपदासाठी ज्येष्ठांसोबत युवा नेते चर्चेत
गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेश कॉंग्रेस समितीचे नवे अध्यक्ष कोण असतील याविषयी चर्चा चालू आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, मडगावचे आमदार दिगंबर कामत तसेच माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्या नावाची तर युवा नेत्यांपैकी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्यासोबत युवा नेते संकल्प आमोणकर व जनार्दन भंडारी हेही प्रदेश अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, पक्षश्रेष्ठींनी अद्याप चोडणकर यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.
दरम्यान, काल दै. नवप्रभाशी बोलताना कॉंग्रेसचे सरचिटणीस जर्नादन भंडारी म्हणाले की, जिल्हा पंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचा जो पराभव झालेला आहे त्याला अध्यक्ष या नात्याने गिरीश चोडणकर यांना एकट्याला जबाबदार धरता येणार नाही. निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देणे ही पक्षाच्या नेत्यांची सामूहिक जबाबदारी असते. जिल्हा पंचायत निवडणुका या राज्यात पक्षाच्या चिन्हावर होत असल्या तरी लोक या निवडणुकीत मते देताना उमेदवार ाचा विचार केला. पक्षाची ताकद २०२२ साली होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिसून येणार असल्याचे ते म्हणाले.