कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या २५ दिवसांपासून शेतकरी नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आज सोमवारी शेतकरी ज्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्या ठिकाणी उपोषणला बसणार असल्याची माहिती स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव यांनी दिली. तसेच शेतकरी नेते जगजीत सिंग यांनी हरयाणाचे शेतकरी २५ ते २७ डिसेंबरदरम्यान टोलही देणार नसल्याची माहिती दिली.
२३ डिसेंबर रोजी शेतकरी दिवस साजरा करण्यात येतो. शेतकरी दिवसाच्या दिनी लोकांनी आपल्या घरी दुपारचे जेवण तयार करू नये, असे आवाहन राकेश टिकैत यांनी देशवासीयांना केले आहे. कृषी कायद्याला विरोध करत असलेल्या शेतकर्यांना आता शिवसेना हिंदचेही समर्थन मिळाले आहे. शिवसेना हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष निशांत शर्मा यांनी २१ डिसेंबर रोजी १२ राज्यांतील ६० जिल्ह्यांमध्ये मेणबत्ती मार्च काढणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच केंद्र सरकारने हे कायदे मागे घेतले नाहीत तर शिवसेना हिंदचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काही शेतकर्यांकडून त्याला समर्थनही मिळत आहे. रविवारी पश्चिम उत्तर प्रदेशातील कृषी भवनात कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची काही शेतकर्यांनी भेट घेत आपण समर्थन करत असल्याचे पत्रही सादर केले.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यासाठी आयोजित सभांच्या पार्श्वभूमीवर आपसात चर्चा करून त्यानुसार नियोजन केले होते. शेतकरी नेत्यांचे म्हणणेे आहे की, जवळपास ३० शेतकर्यांनी आपला जीव दिला आहे. त्यांच्या स्मरणार्थ होणार्या सभांमुळे देशभरातील शेतकरी या आंदोलनाशी जोडला जाईल.
शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी सांगितले की, देशातील सर्व जिल्हे, तहसील व गावांमध्ये झालेल्या श्रद्धांजली सभांमध्ये आंदोलन करतेवेळी जीव गमावलेल्या शेतकर्यांचे स्मरण करण्यात आले.
संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने या श्रद्धांजली सभांसाठी काढलेल्या पोस्टरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्यांची छायाचित्रे लावली होती.
लोकतांत्रिक पक्षाच्या
खासदारांचा पाठिंबा
शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी रालोआचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष खासदार हनुमान बेनीवाल यांनी शनिवारी तीन संसदीय समित्यांचा राजीनामा लोकसभा अध्यक्षांना पाठवून शेतकर्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, बेनीवाल २६ डिसेंबर रोजी दोन लाख समर्थकांसह दिल्लीला रवाना होणार आहेत.
मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली
शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्यांना काल रविवारी शेतकरी संघटनांकडून श्रद्धांजली अर्पण केली. आतापर्यंत या आंदोलनात जवळपास ३० शेतकर्यांचा मृत्यू झालेला आहे.