>> मध्यप्रदेशात शेतकर्यांचे महासंमेलन
नव्या कृषी कायद्यांची माहिती देण्यासाठी मध्यप्रदेशातील रायसेन येथे शेतकरी महासंमेलनाचे आयोजन केले होते. या महासंमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना नव्या कृषी कायद्यांविरोधातील भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. या महासंमेलनात शेतकर्यांना हमीभावाची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात या महासंमेलनाला जमलेल्या शेतकर्यांचे आभार मानले. कृषी कायदे एका रात्रीत तयार करण्यात आलेले नाहीत. यावर गेल्या २०-३० वर्षांपासून राज्यांशी, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांशी, अर्थतज्ज्ञ आणि शेतकर्यांशी चर्चा सुरू होती, असे पंतप्रधान म्हणाले.
तंत्रज्ञानाच्या मदतीनं आता शेतकर्यांना थेट लाभ मिळत आहेत. याची मोठ्या प्रमाणात चर्चाही होत आहे. आम्ही देशातील सर्व शेतकर्यांना शेतकरी क्रेडिट कार्ड देण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता शेतकर्यांना अधिक व्याजदरावर कर्ज घेण्यापासून मुक्ती मिळाली आहे असे पंतप्रधान म्हणाले.
आता शेतकर्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून वार केले जात आहेत. जे लोक शेतकर्यांच्या नावावर आंदोलन करत आहेत त्यांचे सरकार असताना त्यांनी शेतकर्यांसाठी काय केले ते त्यांनी लक्षात घ्यावे. त्यांनी स्वामीनाथन समितीचा अहवाल ८ वर्षे दाबून ठेवत केवळ राजकारणासाठी त्याचा वापर केला. आम्ही स्वामीनाथन समितीचा अहवाल समोर आणत एमएसपी दीडपट केल्याचे मोदी म्हणाले.
शेतकर्यांची फसवणूक झाल्याचे मुख्य उदाहरण मध्यप्रदेशच आहे. प्रत्येक निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात येते. शेतकर्यांपर्यंत पैसा कधी पोहोचत नव्हता. त्यांच्याऐवजी त्यांनी बँकांच्या नोटीसा नाहीतर अटकेचे वॉरंट मिळत असल्याचे मोदी म्हणाले. आमच्या कार्यकाळात शेतकरी सन्मान निधीच्या अंतर्गत पैसे थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. भ्रष्टाचाराची जुगलबंदी आम्ही बंद केली आहे. बंद पडलेल्या खतांचे कारखानेदेखील आता सुरू होत असल्याचे मोदी म्हणाले.