काल शुक्रवारी राज्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७१८ झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या ९६१ एवढी झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित नवे १०४ रुग्ण सापडल्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ८४९ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच काल राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४८,१७० झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. काल खात्यातर्फे १४७४ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली.
आतापर्यंत ३,७८,८१७ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या १३,९८५ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २६,०४४ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत.
दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक १७१ रुग्ण असून केपे ७६, वास्को ६२ तर फोंड्यात ५३ रुग्ण आहेत. उत्तर गोव्यातील पर्वरीत ६८, पणजीत ६२ रुग्ण उपचार घेत असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.
उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे २७५ खाटा रिक्त झाल्या आहेत. तर दक्षिण गोव्यातील ६० पैकी ३४ खाटा रिक्त आहेत. काल कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या १२७ जणांनी घरी तर ३० जणांनी इस्पितळात विलगीकरणात राहण्याचे ठरवले.