सातव्या हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत आज शनिवारी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर एफसी गोवा आणि चेन्नईन एफसी यांच्यात चुरशीचा सामना होईल. गोव्याची पहिल्या सहा सामन्यांतील कामगिरी दोन विजय, दोन पराभव आणि दोन बरोबरी अशी आहे, जी त्यांचा लौकीक सार्थ ठरवणारी नाही. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नईनविरुद्ध त्यांचा सातत्यासाठी प्रयत्न असेल. गोव्यासाठी इगोर अँग्युलो आघाडीवर भेदक ठरला आहे. स्पेनच्या या खेळाडूने संघाचे सात पैकी सहा गोल केले आहेत. बचाव फळीची कामगिरी मात्र अपेक्षित झाली नसून प्रामुख्याने सेट-पिसेसवरील खेळ निराशाजनक ठरला आहे. गोव्याला सहा सामन्यांत सहा गोल पत्करावे लागले असून त्यातील पाच सेट-पिसेसवर झाले आहेत.
नेटच्या दिशेने मारले गेलेले केवळ १५ शॉटच नोंदवले जाणे ही गोव्यासाठी जमेची बाब असून सर्वांत कमी या निकषावर हे प्रमाण स्पर्धेत संयुक्तरित्या दुसरे आहे. अपेक्षित निकाल साध्य करण्यासाठी मैदानावर संघाने शंभर टक्के प्रयत्न करण्यावर गोव्याचे प्रशिक्षक जुआन फरांडो यांनी भर दिला. चेन्नईनचीही कामगिरी सरस झालेली नाही. दोन वेळच्या माजी विजेत्यांना गोल करण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यांच्या खात्यात आतापर्यंत केवळ तीनच गोल आहेत. पाच सामन्यांनंतर पाच गुणांसह गुणतक्त्यातील त्यांचे स्थान आठवे आहे.