सीमा सुरक्षा दलाने एका कारवाईत बुधवारी रात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्या दोन पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले. अमृतसरजवळ असलेल्या अटारी सीमेवर धुक्याचा फायदा घेऊन दोघेजण घुसखोरी करत होते. सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना इशारा दिला. त्यावेळी त्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देताना जवानांनी या घुसखोरांना यमसदनास धाडले.
या घटनेनंतर गुरुवारी सकाळी सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत झाले. या दोन घुसखोरांकडे हत्यारे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलिकडील काळात आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. या पूर्वी २३ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय सीमेवर सांबा सेक्टरमध्ये एक घुसखोर भारतीय सीमेत प्रवेश करत होता. त्यावेळी सीमा सुरक्षा दलाने त्याला ठार केले होते. तर काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या कुपवाडा येथे दहशतवाद्यांची घुसखोरी सुरक्षा दलांनी हाणून पाडली होती.