दलालांकडून शेतकर्‍यांची दिशाभूल ः सावईकर

0
263

कृषी मालाची दलाली करणार्‍या दलालांनी शेतकर्‍यांची दिशाभूल केल्यानेच शेतकर्‍यांनी नवी दिल्लीत आंदोलन केल्याचा आरोप काल माजी खासदार व भाजपचे राज्य सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजपचे राज्य किसान मोर्चा अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर हेही हजर होते. केंद्र सरकारने संमत केलेली विधेयके ही देशातील शेतकर्‍यांच्या हिताचीच आहेत. या विधेयकातील सर्व कायद्यांचा शेतकर्‍यांनाच लाभ मिळणार आहे. या कायद्यातील चांगल्या गोष्टींचे परणाम वर्षभरात दिसून येणार असल्याचा दावाही सावईकर यांनी यावेळी केला.

या कायद्यात कंत्राटी शेतीचा समावेश असून ही कंत्राटी पद्धत लागू झाल्यास देशभरात तसेच गोव्यातही शेती पडीक ठेवण्याचे प्रकार बंद होणार असल्याचे सावईकर यांनी स्पष्ट केले. गोव्यातील शेतकर्‍यांचा या कायद्याला पाठिंबा आहे. आणि म्हणूनच गोव्यातील शेतकरी बंदमध्ये सहभागी झाले नव्हते, असे यावेळी बोलताना किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर यांनी सांगितले.