संजीवनी कारखान्यासंबंधी अंतरिम अहवाल लवकरच : सावईकर

0
234

राज्यातील बंद असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी काय करता येईल या संबंधीचा अंतरिम अहवाल लवकरच गोवा सरकारला सादर करण्यात येईल, अशी माहिती काल माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली.

संजीवनी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या समितीच्या काल झालेल्या बैठकीत कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी कोणती पावले उचलणे गरजेचे आहे त्यावर चर्चा झाल्याचे सावईकर म्हणाले.

यावेळी समितीवरील ऊस उत्पादक असलेल्या सदस्यांनी विविध सूचना केल्याचे सावईकर म्हणाले. ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेऊन हा कारखाना सुरू केला जावा, अशी सूचना यावेळी सर्व सदस्यांनी केल्या. यावेळी समितीचे अध्यक्ष या नात्याने आपण कारखान्याशी संबंधित लोक, तसेच तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे त्याची माहिती सर्वांना दिल्याचे सांगितले. शेतकर्‍यांना आवश्यक ते साहाय्य व नुकसानभरपाई पुढील महिन्यापर्यंत देण्यात येणार असल्याचे सावईकर यांनी सांगितले. अंतरिम अहवाल येत्या काही दिवसांत सरकारकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सावईकर यांनी सांगितले.